कधी होणार मेडिकलची सीईटी ?
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेवरून गोंधळ निर्माण झालेला असताना राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी राज्यातल्या सीईटीबाबत विद्यार्थ्यांना आश्वस्थ केलंय.
मुंबई: वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेवरून गोंधळ निर्माण झालेला असताना राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी राज्यातल्या सीईटीबाबत विद्यार्थ्यांना आश्वस्थ केलंय. सीईटी होणारच असा निर्धार विनोद तावडेंनी व्यक्त केलाय. 5 मे रोजी सीईटी होणार असल्याचं तावडे म्हणाले आहेत.
राज्य सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार असून विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ देणार नाही असा विश्वास व्यक्त केलंय. दोन परीक्षांसाठी एकच मेरीट लिस्ट कशी लावणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान वैद्यकीय प्रवेशासाठी 1 मे रोजी होणा-या नीटला स्थगिती देण्यासाठी केंद्र सरकारनं केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलीय. त्यामुळं नीट परीक्षा वेळापत्रकानुसारच 1 मे रोजी होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोर्टात विद्यार्थी आणि सरकारची बाजू मांडण्यासाठी एटर्नी जनरल उपस्थित नव्हते. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सरकार किती गंभीर आहे हेच दिसून आलं.
वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थ्यांना नीटचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ नाही. या परिक्षा १ मे रोजी होणार असल्यामुळे परिक्षेची व्यवस्था करण्यासाठीही पुरेसा वेळ नसल्याचं सरकारनं सांगितलं. त्यामुळे या निर्णयावर पुर्नविचार करून २४ जूलै रोजीच एका टप्प्यात परिक्षा घेण्याची विनंती करण्यात आली. मात्र, परिक्षा घेण्यासाठी सरकारला पायाभूत सुविधा उपलब्ध करणं शक्य असल्याचं सांगत कोर्टानं सरकारची विनंती फेटाळली.