चेतन कोळस, येवला : सोशल मीडियामध्ये नामांकित असलेल्या फेसबुकला नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातून तांत्रिक मदतीचा हात लाभलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येवल्यातील योगेश तंटक या संगणक अभियंत्यांने फेसबुकला त्रूटी कळवून त्यात सुधारणा करण्याची सूचना केली होती. या सूचनेची दखल घेत फेसबुकने ती दूर केली आणि योगेशला 10 लाखांचं बक्षिसही दिलं.


काय होती त्रूट...


पुण्यातल्या संगणक कंपनीत काम करणारा येवल्यातला रहिवासी योगेश तंटक... योगेशने जगभरात वापरल्या जाणाऱ्या फेसबुकवरील काही त्रुटी फेसबुक टीमच्या निदर्शनास आणून दिल्या. फेसबुकवर इव्हेंट या पर्यायात वापरकर्त्याने एखादा कार्यक्रम टाकला तर ती पोस्ट सुरक्षित राहत नव्हती. शिवाय अशा फेसबुक खात्याची इतर माहिती कोणाही वापरकर्त्याला मिळू शकत होती. याद्वारे कोणाचेही खाते वापरले जाणे सोपे बनत होते. विशेष म्हणजे मूळ फेसबुक खातेधारकाला याचा पत्ता देखील लागत नव्हता. 


...आणि चूक फेसबूकच्या लक्षात आली


ही त्रुटी योगेशच्या लक्षात येताच त्याने मित्रांच्या मदतीने हा दोष फेसबुक टीमच्या निदर्शनास आणून दिला व तसा डेमोदेखील दाखवला. या त्रुटीची खात्री झाल्यावर फेसबुकने योगेशला 15 दिवसांचा अवधी हवा, असा संदेश पाठवला. अॅन्ड्रॉईड सिस्टीमला सुरक्षेच्या दृष्टीने हा मोठा धोका असल्याचं लक्षात आल्याने फेसबुकने योगेशची सूचना गांभिर्याने घेतली आणि अखेरीस चूक लक्षात आल्यावर त्यात दुरुस्ती करून पुन्हा महिनाभर सुरक्षेची खात्री केल्यावर फेसबुकने योगेशचं अभिनंदन केलं.


योगेशला 10 लाखांचं बक्षीस


फेसबुकला केलेल्या मदतीबद्दल फेसबुकने योगेशचे नाव आपल्या थँक्स पेजवर टाकून आभार मानलेत. योगेशच्या मदतीबद्दल फेसबुकने त्याला सुमारे 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आणि ही रक्कम त्याच्या खात्यावर वर्गदेखील केली.