मुंबई : ही फक्त नावाला आजी आहे. तिचं काम एखाद्या तरुणीला लाजवेल असंच आहे. 106 वर्षांची जंगलात राहणारी ही आजी युट्यूब स्टार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही आजी मसथान-अम्मा. आंध्र प्रदेशातल्या गुंतूर जिल्ह्यातल्या एका जंगलात ती राहते. अम्मा युट्यूबवर प्रचंड लोकप्रिय आहे. तिचं वय तब्बल 106 वर्षं. जगातली सगळ्यात ज्येष्ठ युट्यूबर आणि इंटरनेट सेन्सेशन. ती विविध पाककृती करते आणि त्या युट्यूबवर अपलोड करते. 


ऑक्टोबर 2016 मध्ये पहिल्यांदा या मसथान अम्माची ही पाकशाळा सुरू झाली. विशेष म्हणजे 8 महिन्यांतच तिच्या पदार्थांचा स्वाद आणि रेसिपी देशा-विदेशात पोहोचली. 


मस्थान अम्माच्या मेनूमधलं स्पेशल म्हणजे Emu Egg, ऑमलेट, चिकन, भेंडीची भाजी, वांग्याची भाजी, ढोबळी मिरची आणि बटाट्याची भाजी आणि फ्राईड राईस   


मसथान-अम्मा नेटिझन्समध्ये एवढी लोकप्रिय झालीय, की युट्यूबवर तिचे अडीच लाखांपेक्षाही जास्त सबस्क्रायबर्स आहेत. दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांमध्ये वाढच होतेय.


मसथान-अम्माचे चाहते फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही आहेत. 106 वर्षांच्या या अम्माच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे Country Foods... मसथान अम्माचा नातू तिला युट्यूबवर व्हिडीओ अपलोड करुन देतो.  


मसथान-अम्मा आंध्र प्रदेशातलं एक छोटंसं गाव गुडिवाडात राहते. एकदा तिनं तयार केलेली रेसिपी सहज म्हणून तिच्या नातवानं यु ट्यूबवर अपलोड केली. पाहता पाहता या रेसिपीला बरेच हिटस् आणि लाईक्स मिळाले. आणि मसथान अम्माच्या कुकिंगचा हा सिलसिला सुरू झाला. आज ती इंटरनेटची सुपरस्टार आहे.


मसथान-अम्माच्या काही लोकप्रिय पदार्थांमध्ये पारंपारिक चिकन करी, तळलेल्या भेंडीची भाजी, कलिंगड आणि अंड्याची भुर्जी, वांग्याचं भरीत, बीटाची भाजी, अंड्याचा डोसा यांचा समावेश आहे. पण अम्मानं आतापर्यंत केलेला सुपरहिट पदार्थ म्हणजे टरबूजातलं चिकन.


मसथान अम्माच्या सगळ्या रेसिपी युट्यूबवर सुपरहिट आहेत. वयाची शंभरी ओलांडल्यानंतर तिनं हे सगळं सुरू केलंय. एज इज जस्ट नंबर. हे तिनं पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलंय.