मुंबई : अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचा भूमीपूजन कार्यक्रमाची प्रसिद्ध करण्यासाठी राज्य सरकार तब्बल 18 कोटी रुपये खर्च करणार आहे. एकीकडे या स्मारकाचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  त्याची जय्यत तयारी सरकारने सुरू केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईसह 10 महापालिका निवडणुका आणि 26 जिल्हापरिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये याकामाचे श्रेय सरकारला मिळावे. यासाठी शिवस्मारक भूमीपजूनाची सर्वदूर प्रसिद्धी केली जाणार आहे. यासाठी राज्यभरात जवळपास 5 हजार होर्डींग्ज लावण्यात येणार आहेत. यातील 1800 होर्डींग्ज हे माहिती व जनसंपर्क विभागाच्या मालकीचे आहेत. तर उर्वरित होर्डींग्जसाठी सरकार भाडे भरणार आहे.


मुंबईत मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स लावून याची प्रसिद्धी केली जाणार आहे. त्याचबरोबर राज्य स्तरावरील आणि स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आणि वृत्तवाहिन्यांवर या कार्यक्रमाच्या जाहीरातीही दिल्या जाणार आहेत. राज्यातील 37 जिल्हा मुख्यालयांना या कार्यक्रमाची जाहीरात आणि प्रसिद्धी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकीकडे राज्य सरकारवर साडेतीन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज असताना. तिजोरीत खडखडाट असताना अशा प्रकारे केल्या जाणाऱ्या खर्चाबाबत आश्चर्य व्यक्त केली जात आहे.