राज्यात भाजप-शिवसेना युती सरकारला दोन वर्ष पूर्ण
राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारला सत्तेत येऊन आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. दोन वर्षात सरकारला अनेक पातळ्यांवर विविध समस्यांचा सामना करावा लागला. त्यात प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, नापिकी, शेतमालाचे कोसळलेले भाव यांचा समावेश आहे. या आघाड्यांवर आजही सरकारला झगडावे लागतंय. प्रामुख्यानं कोसळलेल्या शेतमालांच्या भावामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे.
मुंबई : राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारला सत्तेत येऊन आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. दोन वर्षात सरकारला अनेक पातळ्यांवर विविध समस्यांचा सामना करावा लागला. त्यात प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, नापिकी, शेतमालाचे कोसळलेले भाव यांचा समावेश आहे. या आघाड्यांवर आजही सरकारला झगडावे लागतंय. प्रामुख्यानं कोसळलेल्या शेतमालांच्या भावामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे.
शेतमालाला योग्य भाव देऊन शेतक-यांची नाराजी दूर करण्याचं आव्हान तिस-या वर्षात सरकारसमोर आहे. तर दुसरीकडे नागरी भागातील पायाभूत सुविधांवर सरकारनं विशेष लक्ष दिलंय. मुंबई, नागपूर, पुण्यात मेट्रोचे जाळं उभं करण्यासाठी सरकारनं युद्ध पातळीवर पावलं उचलली आहेत. उद्योग क्षेत्रातील राज्याची आघाडी आजही कायम असल्याचा दावा सरकारनं आपल्या द्विवर्षपूर्तीनिमित्त केलाय.
वर्षभरापूर्वी मेक इन इंडिया सप्ताहात राज्यात आठ लाख कोटींची गुंतवणूक झाली. ती प्रत्यक्षात आणण्याचं मोठं आव्हानही सरकारसमोर आहे. त्यातच फॉक्सकॉन कंपनीनं जाहीर केलेल्या 30 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबाबत कोणतीही प्रगती झालेली नाही. त्यामुळे उद्योग वाढीत आणि परदेशी गुतंवणुकीत आपली आघाडी कायम ठेवण्याचा प्रयत्न सरकारला पुढील वर्षात करावा लागणार आहे. तर मराठा आणि धनगर आरक्षणाचा पेचही सरकारला सोडवावा लागेल.