रुग्णालयांत 24X7 सुरक्षा रक्षक तैनात
निवासी डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनानंतर सरकारनं दिलेल्या आश्वासनाप्रमाणे, मुंबईतल्या केईएम, नायर, सायन आणि कूपर रुग्णालयात आज सुरक्षारक्षकांची पहिली तुकडी तैनात करण्यात आली. डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आता रुग्णालयांमध्ये 24 तास पुरेसे सुरक्षा रक्षक तैनात असतील.
मुंबई : निवासी डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनानंतर सरकारनं दिलेल्या आश्वासनाप्रमाणे, मुंबईतल्या केईएम, नायर, सायन आणि कूपर रुग्णालयात आज सुरक्षारक्षकांची पहिली तुकडी तैनात करण्यात आली. डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आता रुग्णालयांमध्ये 24 तास पुरेसे सुरक्षा रक्षक तैनात असतील.
महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे हे सुरक्षा रक्षक असून, यामध्ये महिला सुरक्षा रक्षकांबरोबरच सशस्त्र सुरक्षा रक्षकांचाही समावेश असणार आहे. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबरोबरच ओपीडी, वॉर्ड, कॅज्यूल्टी, अतिदक्षता विभागातही सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आलंय. मुख्य प्रवेशद्वारातच रूग्णांच्या नातेवाईकांची तपासणी करून आत सोडले जाईल. तसंच रुग्णाच्या केवळ दोन नातेवाईकांनाच रुग्णालयात प्रवेश दिला जात असून, यासाठी पास सिस्टीम सुरु करण्यात आलीय.
महापालिकेच्या या चार प्रमुख रुग्णालयांत सुमारे चारशे सुरक्षा रक्षक नेमले जाणार आहेत. त्यापैकी आज पहिल्या टप्प्यातल्या काही सुरक्षा रक्षकांचं पथकं दाखल झालंय. या सुरक्षा रक्षकांसोबतच रुग्णालयाचे सुरक्षा रक्षकही तैनात असणार आहेत. तसंच रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी संबंधित डीन दिवसातून दोन ते तीन वेळा रुग्णालयात पाहाणीही करणार आहेत.
रुग्णालयातल्या डॉक्टरांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी झी २४ तासच्या रोखठोक कार्यक्रमात आश्वासन दिलं होतं.