मुंबई : एकीकडे श्रीनगरमध्ये GSTचे दर ठरले असताना राज्याचा GST संमत करण्यासाठी 3 दिवसाचं विशेष अधिवेशन मुंबईत होतं आहे. केंद्रात याला सर्वपक्षीय संमती मिळाली असल्यामुळे राज्यात चर्चा करून विधेयक मंजुर करण्याची औपचारिकता बाकी आहे. खरं लक्ष असेल ते विरोधक आणि शिवसेनेच्या शेतकरी कर्जमाफीबाबत भूमिकेकडे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधकांच्या संघर्ष यात्रेचा चौथा आणि शेवटचा टप्पा नुकताच पार पडला. संपूर्ण यात्रेला अभुतपुर्व प्रतिसाद मिळाल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. जीएसटी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी बैठक घेत पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन भाजपा सरकारला घेरण्याची रणनिती आखली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे विरोधकांच्या बहिष्कारानं गाजलं होतं. तेव्हा हे जीएसटीसाठीचं विशेष अधिवेशनही विरोधकांमुळे गाजण्याची चिन्हं आहेत. 


एकीकडे विरोधकांनी भाजपा सरकार विरोधात कंबर कसली असताना सत्तेत असलेल्या शिवसनेनेही कर्जमाफी मुद्द्यावरुन नाशिकला शेतकरी अधिवेशन घेत वातावरण तापवायला सुरुवात केली आहे. त्यात शेतकरी मुद्द्यावरुन विविध आंदोलने करणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सेनेला साथ दिली आहे.


जीएसटीसाठी होणाऱ्या विशेष अधिवेशनत राज्यातील कर आकारणीबाबत चर्चा होत राज्यातील जीएसटी मंजूर करण्याचा सोपस्कार पार पाडला जाणार आहे. असं असलं तरी शेतकरी कर्जमाफी आणि शेतकरी आत्मम्हत्या या मुद्दयांचे पडसाद हे या अधिवेशानात उमटणार हे नक्की. भाजपा पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन सेनेची समजुत घालतो का, विरोधकांचा सामना कसा करतो यावर यापुढच्या राजकीय घडामोडी अवलंबून असणार आहेत.