मुंबई : काही दिवसांपूर्वी देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये कचऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागल्याचं समोर आलं होतं... यामुळे संपूर्ण मुंबईभर धुराचे लोट पसरल्याचं चित्र होतं. याच प्रकरणी एक धक्कादायक खुलासा झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवनार डम्पिंग ग्राऊंडला आग लागली नव्हती तर जाणून बुजून लावण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक केलीय. हे नऊ जण भंगाराचे व्यापारी आहे. २८ जानेवारी आणि २० मार्च रोजी देवनागर डम्पिंग ग्राऊंडमध्ये आगीचे लोळ उठलेले दिसले होते. 


उल्लेखनीय म्हणजे या भंगार व्यापाऱ्यांकडे व्यावसायाचं कोणत्याही प्रकारचं लायसन्स  किंवा अधिकार नाहीत. देवनार डम्पिंग ग्राऊंडलगतच्या भिंतीजवळच ते आपला व्यवसाय करतात. यासाठी कचरा गोळा करण्यासाठी ते अल्पवयीन मुलांचाही वापर करतात. या मुलांकरवी कचऱ्याच्या ढिगाला लावलेली आग विझल्यानंतर त्यातील धातू गोळा करण्यासाठी हा सगळा खटाटोप करण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.  


या सर्वांना आज दुपारी कुर्ला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेनं यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलीय.