मुंबई : अॅसिड हल्ल्यातल्या पिडितांना केवळ सुरुवातीला सरकारी मदत देणं पुरेस नाही. हे पुन्हा एकदा समोर आलंय. कारण नवी मुंबईत राहणारी अॅसिड पीडित महिला आजही मदतीच्या प्रतिक्षेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेरुळमध्ये राहणारी माबिया.... 2012 मध्ये तिच्या चेह-यावर नव-यानंच अॅसिड फेकलं. त्या हल्यात माबियाला आपली दृष्टी गमवावी लागली. तिला आठ वर्षांची मुलगीही आहे. गेल्या पाच वर्षात माबियावर 21 सर्जरी झाल्यात. तर आणखी 14 ते 15  सर्जरी बाकी आहेत. मात्र, आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं वैद्यकीय उपचार आणि इतर खर्चही भागवता येत नाहीत. माबियाच्या अवस्थेमुळे तिच्या वडिलांनाही सतत सोबत राहवं लागतंय. 


माबियासारख्या अनेक पीडित आहेत ज्यांच्यावर कित्येक वर्षांपासून उपचार सुरु आहेत. मात्र, पुरेसे पैसे नसल्यानं अनेक सर्जरी प्रलंबित आहेत. कुटुंबानं साथ सोडली, चेहरा खराब झाला, आणि त्यातच नोकरी मिळत नसल्यानं त्या आर्थिकरित्या सक्षम होऊ शकत नाहीत. नुकतंच महिला आयोगानंही अॅसिड पीडितांच्या मोफत उपचारासाठी काही हॉस्पिटल्सना पत्र लिहिलंय. 


मुलींवर अॅसिड हल्ला झाला की, सरकारकडून तिला तात्पुरती मदत मिळते. मात्र, त्या तात्पुरत्या मदतीमुळे पीडितांचा प्रश्न सुटत नाही. त्यामुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक या सगळ्याच बाबतीत त्या खचल्यात. त्यांना गरज आहे ती आपल्या सगळ्यांच्याच मदतीची.