मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अटकेचे पडसाद विधीमंडळात उमटले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार काळ्या फिती लावून सभागृहात आलेत. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शनं करत या आमदारांनी भुजबळांच्या अटकेचा निषेध केला. 


११ वाजता विधानसभेचं कामकाज सुरू होताच राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे प्रश्नोत्तराचा तास रद्द करून भुजबळांच्या अटकेबाबत चर्चेची मागणी केली. याला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अनुमोदन दिलं. मात्र, या विषयावरील चर्चा नियमात बसत नसल्याचं सांगत संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी या प्रस्तावास विरोध केला.


भाजपचे अनिल गोटे यांनीही भुजबळ तपासात सहकार्य करत नसल्याचं सांगत अटकेचं समर्थन केलं. मात्र, विरोधक आमदारांनी घातलेल्या गोंधळामुळं विधानसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं. कामकाज सुरू झाल्यानंतर पुन्हा विरोधकांचा गोंधळ कायम होता. विधान परिषदेतही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला.