नवी मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या प्रिंटींग प्रेसवर आज दोन अज्ञात बाईकस्वारांनी दगडफेक केली. गेल्या आठवड्यात सामनामधून मराठा क्रांती मोर्चाबद्दल व्यंगचित्र छापण्यात आलं. त्या व्यंगचित्रानंतर मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होतोय. अनेक ठिकाणी सामनाची होळी करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज त्याचाच परिपाक दगडफेकीत झाल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे ठाण्यातील नितीन कंपनी जवळील श्रीजी आरकेड इमारतीतील पहिल्या मजल्यावर सामना दैनिक कार्यालयावर अज्ञातानी शाईफेक केली. सामना पेपर मधील व्यंग्यचित्रप्रकरणी ही शाईफेक करण्यात आली.


सामना वर्तमानपत्रात मराठा समाजाच्या मूक मोर्चाबाबत छापून आलेल्या व्यंगचित्राचे पडसाद राज्यातल्या विविध भागात उमटले. मीरा-भायंदरमधल्या मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी व्यंगचित्रकार श्रींनिवास प्रभुदेसाई यांच्या विलेपार्ले येथील घराबाहेर आंदोलन केले. नाशिकमध्येही सिडकोच्या त्रिमूर्ती चौकात सामनाच्या अंकाची होळी करण्यात आली. 


जिल्ह्यात सर्वत्र याबाबत संताप व्यक्त करण्यात येत असून ठिकठिकाणी होळी करण्यात येतेय. पोलीस आयुक्तांना याबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या महिला संघटनेनं निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.