सेनेचा महापौर झाला तर आनंदच - बाळा नांदगावकर
मुंबईत शिवसेनेचा महापौर झाला तर मला आनंदच होईल, असं वक्तव्य करून मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अनेकांना धक्का दिलाय.
मुंबई : मुंबईत शिवसेनेचा महापौर झाला तर मला आनंदच होईल, असं वक्तव्य करून मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अनेकांना धक्का दिलाय.
'पराभवातही संधी'
महापौरपदाबाबत बोलताना नांदगावकरांनी हे विधान केलंय. 'निवडणुकीत कुणाचा तरी विजय होतंच असतो... जय पराजय होतंच राहणार... पण, पराभवात संधीही शोधायची असते... भाजपचा विजय आणि आमचा पराजयही आम्हाला मान्य करावा लागेल... पुढे काय करायचं हेही पाहावं लागेल...' अशा सूचक शब्दांत बाळा नांदगावकर यांनी मनसेच्या पुढच्या दिशेविषयी भाष्य केलंय.
माझं कूळ आणि मूळ शिवसेनाच आहे... त्यामुळे, शिवसेनेचा महापौर झाला तर मला आनंदच होईल, असं त्यांनी म्हटलंय.
सेना-भाजची गोची
सध्या शिवसेना - भाजपच्या सुरू असलेल्या चर्चांबद्दल बोलताना मात्र नांदगावकर यांनी टोमणा मारायची संधी सोडली नाही. मुंबई महानगर पालिकेतील निकालामुळे दोघांचीही अडचण झालीय... दोघांनाही जनतेचा कौल नाविलाजानं का होईना, मान्य करावाच लागेल...' असं त्यांनी म्हटलंय.
शिवाय, छत्रपती, शाहू, फुलेंच्या विचारांचा महापौर असावा, असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय. मनसे या सत्ता समिकरणात काय भूमिका घेणार या प्रश्नावर 'मनसेनं काय करायचं याचा निर्णय पक्षाध्यक्ष राज ठाकरे लवकरच घेतील' असं नांदगावकर यांनी म्हटलंय.