मुंबई: मुंबईकरांची लाईफ लाईन असलेली रेल्वे अनेक सिनेमांमध्ये झळकते. गेल्या वर्षभरात जवळपास 18 सिनेमे आणि टिव्ही सिरिअल्समध्ये मध्य रेल्वे झळकली. केवळ पडद्यावर दिसण्यापुरतीच मध्य रेल्वेची भूमिका नसते, तर या माध्यमातून रेल्वेला चक्क कमाईची संधी मिळत आहे. 


रेल्वेनं वर्षभरात कमावले 81 लाख रुपये


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमाच्या शुटींगमधून मध्य रेल्वेने 2015-16 या एका वर्षात 81 लाख 21 हजार 794 रुपये कमवलेत. बागी सिनेमाने पाच दिवसाच्या शुटींगसाठी 24 लाख 97 हजार 732 रुपये मोजले. प्रेम रतन धन पायोने तीन दिवसांच्या शुटींगसाठी 8 लाख 9 हजार 72 रुपये, '24' तमीळ फिल्मने एका दिवसासाठी 6 लाख 60 हजार 510 रूपये, जज्बा या सिनेमाने पाच दिवसासाठी 6 लाख 47 हजार 065 रूपये अशा एकूण 18 सिनेमा, टिव्ही सिरिअल, डॉक्यूमेंट्रीचे शुटींग मध्य रेल्वेच्या स्थानकांवर झालं आहे. 


कोणतं स्टेशन आहे पॉप्युलर ?


पनवेलजवळचं आपटा स्टेशन सिनेमाच्या शुटींगसाठी पॉप्युलर बनलंय. एकट्या आपटा स्थानकानं शुटींग भाड्यापोटी 31 लाख 58 हजार रुपये कमवले. त्यानंतर वाडीबंदर स्थानकानं वर्षभरात 13 लाख 83 हजार कमवले. सीएसटी स्थानकालाही जोरदार पसंती असून वर्षभरात त्यासाठी 7 लाख 59 हजार देण्यात आलेत. तसंच एलटीटी, लोणावळा, सातारामधील वठार रेल्वे स्टेशनचीही मागणी वाढतेय. 


काय आहे स्टेशनचा रेट ?


ए 1 स्थानक म्हणजेच उपनगरी स्थानकांवर शुटिंगसाठी दिवसाचे 1.25 लाख रुपये द्यावे लागतात. एका कोचसाठी 15 हजार रुपये तर पाच कोचसाठी 4.5 लाख रुपये मोजावे लागतात.पॅसेंजर ट्रेनमध्ये एकदा चढण्याचे 30 हजार रुपये घेतले जातात. शुटींग जितकावेळ होईल त्याहिशेबाने पैसे वाढवले जातात. 


उपनगरी स्थानके सोडून इतर ठिकाणच्या शुटींगसाठी 50-60 हजार रुपये घेतले जातात. शक्यतो रविवारच्याच दिवशी शुटींगसाठी परवानगी दिली जाते. तसंच शेवटची लोकल ते पहिली लोकल या काळातच शुटींग संपवण्याची परवानगी आहे.