मुंबई : सध्या तुरुंगात असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी तीन पानी पत्र लिहीलं आहे. या पत्रामध्ये भुजबळांनी नुकताच्या झालेल्या निवडणुकांमधील यशाबद्दल फडणवीस यांचे अभिनंदन केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासोबतच भुजबळांनी त्यांचा मतदार संघ असलेला नाशिकच्या येवल्यातील शेतकऱ्यानं केलेल्या इच्छा मरणाच्या मागणीचाही उल्लेख केला आहे. कृष्णा भगवान डोंगरे यांची इच्छा मरणाची मागणी ऐकून मन सुन्न झालं आहे. एवढं घडूनही मंत्रीमंडळातील कोणीही किंवा पक्षाचा पदाधिकारी डोंगरेंच्या भेटीला गेला नाही याची मला खंत आहे, असं भुजबळ म्हणालेत.


शेतमालाला हमी भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर ही वेळ आली असल्याचं वक्तव्य भुजबळांनी केलं आहे. उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव दिला नाही तर कर्जमाफी दिली जाते. हा त्यांचा हक्क आहे. शेतकऱ्यांना भीक नको, हक्काची कर्ज माफी हवी आहे, अशी मागणी भुजबळांनी केली आहे. तुमच्यासारख्या संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी कृष्णा डोंगेरेंसह राज्यातल्या शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी अपेक्षा भुजबळांनी पत्रातून व्यक्त केली आहे.