सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर, मुख्यमंत्र्यांचे आदेश
सिंधुदुर्गचे जिल्ह्याधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यावर त्वरीत कारवाई करा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केली.
मुंबई : सिंधुदुर्गचे जिल्ह्याधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यावर त्वरीत कारवाई करा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केली. लोकप्रतिनिधींवर अधिकारी हल्ला करीत असतील ते योग्य नाही. तसेच याप्रकरणी सत्ताधिरी सदस्यांनी आणि विरोधकांनी हा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याने कावाईची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश दिलेत.
सिंधुदुर्गात डंपर चालक-मालकांनी आपल्यावरील अन्यायाविरोधा आंदोलन केले. यावेळी आंदोलनात आमदार नितेश राणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगांवकर, जिल्हा गौण खनिज संघटनेचे अध्यक्ष दत्ता सामंत उतरले होते. त्यांच्यासह ४० जणांवर लाठीमार करण्यात आला होता. तसेच या सर्वांना अटक करण्यात आली होती. आरोस येथील प्रथमवर्ग मुख्य न्यायदंडाधिकारी आर. व्ही. हुद्दार यांनी प्रत्येकी सात हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर गुरुवारी मुक्तता केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेल्या जाचक अटींमुळे त्रस्त झालेल्या जिल्ह्यातील डंपरचालक मालकांनी ४ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते. ५ मार्च रोजी नितेश राणे यांच्या विनंतीनंतरही जिल्हाधिकारी चर्चेसाठी तयार नसल्याने आमदार नितेश राणे व आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी दालनाकडे मोर्चा वळवला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे व त्यांच्या शिघ्र कृती दलाने अमानुष लाठीमार केला. याप्रकरणी विधासनसभेत राणे यांना आवाज उठवला. त्यांना विरोधकांसह सत्ताधाऱ्यांची साथ मिळाली. हा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीही या घटनेचा निषेध नोंदविला. तसेच विधानसभा अध्यक्षांनी चिंता व्यक्त केली.
या लाठीमारानंतर आमदात नितेश राणे यांच्यासह जखमी ७० ते ८० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. नितेश राणेंसह ३८ जणांना कणकवली येथील न्यायालयाने १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली होती.
काय घडलं विधानसभेत?
- विधानसभेत सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांविरोधात कारवाईची मागणी
- आमदार नितेश राणे यांनी केली मागणी
- विधानसभेत जिल्हाधिकाऱ्यांविरोधात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांची घोषणाबाजी
- सिंधुदुर्गातील डंपर चालक-मालकांचे प्रश्न घेऊन आमदार जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेसाठी गेले होते
- जिल्हाधिकाऱ्यांनी भेट नाकारली आणि आमदारांवर लाठी हल्ला केला
- लाठी हल्लानंतर आमदारांवर उपचार केले म्हणून सिव्हिल सर्जनाला जिल्हाधिकाऱ्यांची धमकी
- विधानसभेत अनेक आमदार, विरोधी पक्ष नेते सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांविरोधात आक्रमक
- गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज 15 मिनिटं तहकूब
- पुन्हा कामकाज सुरु होतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठल्याचे जाहीर केले.