मुंबई : यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आमनेसामने लढणार आहेत. राज्यात आणि केंद्रात शिवसेना-भाजप युती कायम असली तरी महापालिका निवडणुकीत ही युती नसणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत या दोन्ही पक्षातील संघर्ष चांगलाच वाढलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्षा निवासस्थानी गुरूवारी रात्री काही निवडक पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील महापालिका निवडणुकांविषयी, मुंबईतील शिवसेना भाजप यांच्यातील संघर्षाविषयी तसेच शिवसेनेने सरकारला दिलेल्या 'नोटीस पिरियड' विषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. 


या क्षणाला तरी शिवसेना आमच्यासोबत राज्यात आणि केंद्रातही आहे. त्यातूनही काही झालेच तर आमचे सरकार कोणत्याही परिस्थितीत पडत नाही. निवडणुका कोणालाही परवडणाऱ्या नाहीत, त्यामुळे आम्ही आमची पाच वर्षे पुर्ण करणारच असा ठाम विश्वास  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केलाय. माझा विरोध शिवसेनेला नव्हे तर त्यांच्या कार्यपद्धतीला आहे, माझा अजेंडा केवळ विकासाचा आहे असे त्यांनी स्पष्ट केलंय.


शिवसेनेने तुम्हाला नोटीस पिरियड दिला आहे असे विचारले असता ते म्हणाले की, शिवसेना आता तरी आमच्यासोबतच आहे. राज्यात आणि केंद्रातही ते आमच्यासोबत सत्तेत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून पाठिंबा काढून घेण्याच्या मुद्यावर मी आतातरी प्रतिक्रिया देणार नाही. मात्र निवडणुका कोणालाच परवडत नाहीत. सत्तेसाठी लोकच पुढे येऊन वेगवेगळे फॉर्म्युले तयार करत असतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आमचे सरकार पडत नाही. १८ फेब्रुवारीला पाठिंबा काढण्याची शिवसेनेची निव्वळ दबावाची खेळी आहे. त्यामुळे आम्ही आमची पाच वर्षे पूर्ण करणारच असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.