शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची घाई करू नये - मुख्यमंत्री
राज्यातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले असले तरी काही ठिकाणी खरीपाच्या पेरणीसाठी हा पुरेसा पाऊस नाही.
मुंबई : राज्यातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले असले तरी काही ठिकाणी खरीपाच्या पेरणीसाठी हा पुरेसा पाऊस नाही.
तसेच हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही भागात 26 जूननंतर चांगला पाऊस अपेक्षित आहे. पेरणीची घाई केल्यास दुबार पेरणीचे संकट उद्भवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची घाई करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केले आहे.
राज्यात सध्या बऱ्याच ठिकाणी मान्सूनचा पाऊस दाखल झाला आहे. सध्या पडत असलेला पाऊस आणि अपेक्षित समाधानकारक पाऊसमानामुळे शेतकऱ्यांनी उत्साहात पेरणीची तयारी केली आहे. मात्र, खरीप पेरणीसाठी अजून काही कालावधी शिल्लक आहे.
तसेच येत्या काही दिवसांत मान्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. विशेषत: नाशिक आणि विदर्भाच्या काही भागात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही.
मराठवाड्यातील एक-दोन जिल्ह्यातही तशीच परिस्थिती आहे. या सर्व भागात 26 जूननंतर समाधानकारक पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
दरम्यान, राज्यात खरीपासाठी खते आणि बियाण्यांची पुरेशी तरतूद करण्यात आली आहे. तसेच महाबीज मार्फत विक्री करण्यात येणाऱ्या बियाण्यांच्या दरवाढीसही स्थगिती देण्यात आली आहे.
मात्र, या स्थगितीत कापूस आणि सोयाबीनच्या बियाण्यांचा समावेश नाही. ज्या शेतकऱ्यांनी शासनाच्या या निर्णयापूर्वी महाबीजकडून वाढीव दराने बियाण्यांची खरेदी केली असेल त्यांच्या खात्यात परतावा जमा केला जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीच्या पावत्या जपून ठेवणे गरजेचे आहे.