COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई :  जर्मन एअरफोर्सनं दाखवलेल्या तत्परतेमुळं मोठी दुर्घटना टळली आहे. कारण मुंबईहून लंडनकडे जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानाचा ATC शी (एअर ट्रॅफिक कंट्रोलशी) हवेतच संपर्क तुटला आणि जर्मनीच्या एअरफोर्सनं तत्परता दाखवतंस विमानाला पुढील  दिशा दाखवल्याने अनर्थ टळला.


ही घटना १६ फेब्रुवारीची असल्याचं सांगण्यात येत आहे, बोईंग-777 हे विमान मुंबईहून लंडनला चाललं होतं. यावेळी जर्मनीतील कोलोनजवळ विमानाचा 'एटीसी'शी संपर्क हवेतच तुटला. 


यावेळी जर्मनी एअरफोर्सच्या २  विमानांनी हवेत उड्डाण घेऊन, जेट एअरच्या विमानाच्या वैमानिकांसोबत इंटरसेप्ट कॉन्टॅक्ट स्थापन करण्यात यश मिळवलं. यानंतर जेट एअरवेजच्या विमानाचा एटीसीशी संपर्क होईपर्यंत जर्मनीच्या विमानांनी दिशा दाखवली. या घटनेचा व्हिडीओ युट्यूबवर पोस्ट करण्यात आल्याने या घटनेची पुष्टी होण्यास मदत होत आहे.


जेट एअरवेजच्या 9W118 या विमानाचा जर्मनीतील लोकल एटीसीशी संपर्क तुटला असल्याचं मान्य केलं. पण हा संपर्क काहीच मिनिटांसाठी तुटला असं,जेट एअरवेजच्या प्रवक्त्यांनीही सांगितलं.


यानंतर हे विमान ३३० प्रवासी आणि १५ क्रू मेंबरसह सुरक्षित लंडनमध्ये उतरलं. पण या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, या घटनेदरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून जर्मन एअरफोर्सनं २ विमान तयार ठेवली होती.