रावतेंना गटनेते पदावरून डच्चू मिळण्याचे संकेत
विधान परिषदेतील शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांना पहिला धक्का बसलाय. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना गटनेते पदावरून डच्चू मिळणार आहे.
मुंबई : विधान परिषदेतील शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांना पहिला धक्का बसलाय. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना गटनेते पदावरून डच्चू मिळणार आहे.
शिवसेनेच्या विधान परिषद गटनेतेपदी अनिल परब यांची वर्णी लागल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आज होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेच्या शिवसेना गटनेतेपदी गेल्या काही काळापासून दिवाकर रावते होते. मात्र मंत्रीमंडळात असल्यानं त्यांना शिवसेनेची भूमिका नीट मांडता येत नव्हती.
नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अनिल परब यांनी मोलाची कामगिरी करत शिवसेनेला आपला गड राखण्यास मदत केली होती. त्याचंच बक्षीस म्हणून त्यांची विधान परिषद गटनेतेपदी वर्णी लागल्याचं बोललं जातंय. उद्धव ठाकरे यांच्याकडून विधान परिषदेतील सेनेच्या मंत्र्यांच्या खांदेपालटाचे स्पष्ट संकेत शिवसेनेकडून देण्यात आले आहेत.