मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आज विरोधकांचा गोंधळ समोर आला. दुष्काळासारखा महत्त्वाचा मुद्दा बाजूला ठेवत विरोधकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना विधानसभेत घेरले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या मुद्यावर विधानभवनाच्या बाहेर आक्रमक आंदोलन करणारे विरोधकांनी विधानसभेत मात्र हा मुद्दा बाजूला ठेवला. विरोधकांच्या या फसलेल्या रणनीतीमुळे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी विरोधकांना चांगलेच चिमटे काढले.


विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे सरकारविरोधात सुरू असलेले हे आक्रमक आंदोलन.. शेतकरी आणि दुष्काळाच्या प्रश्नावर विरोधक सरकारविरोधात घोषणाबाजी करत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा समोर आणण्यासाठी विरोधकांनी शेतकऱ्याची प्रतिकात्मक तिरडीही या ठिकाणी ठेवली होती. 


एकीकडे दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जोरदार घोषणा देणाऱ्या विरोधकांची विधानसभेतील भूमिका मात्र वेगळीच होती. विधानसभेत विरोधकांनी दुष्काळाऐवजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या मुद्याला प्राधान्य दिले. मंत्री झाल्यानंतर विनोद तावडेंनी खाजगी कंपन्यांच्या संचालक पदाचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे तावडे यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी विरोधकांनी विधानसभेत केली.


विरोधकांच्या या फसलेल्या रणनितीचा सत्ताधारी पक्षाने चांगलाच समाचार घेतला. विरोधकांना दुष्काळाचा प्रश्न महत्त्वाचा की मंत्र्यांचा असा सवाल उपस्थित करत विरोधक गोंधळले आहेत असा आरोप महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केला.


लाभाच्या पदाच्या मुद्यावरून इंदिरा गांधी आणि सोनिया गांधींनी राजीनामा दिला होता, अशी इतिहासातील आठवण काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना करून दिली. तर दुसरीकडे एकनाथ खडसेंच्या आरोपांना विरोधकांनी उत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.