कृष्णात पाटील, झी मिडिया, मुंबई : मोठा गाजावाजा करत वजनदार इमामला इतिप्तमधून मुंबईत आणलं.... पण आता आ बैल मुझे मार...अशी गत सध्या मुंबईच्या सैफी हॉस्पिटलची झालीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातील सर्वाधिक वजनाची म्हणजे ५०० किलो वजनाची इजिप्तची इमान अहमद...गेल्या २३ वर्षांपासून घराच्या बाहेरही न पडलेल्या इमानचे वजन कमी करण्यासाठी पुढं पाऊल टाकलं ते मुंबईतल्या सैफी रूग्णालयातील बेरियाटृीक सर्जन मुफ्फजल लकडावाला यांनी. मग उपचारासाठी तिला खास विमानाने भारतात आणले आणि तिच्यावर बेरियाटृीक सर्जरीही करण्यात आली. 


यानंतर बातम्या सुरू झाल्या...इमानचे वजन कमी होत असल्याच्या...आता तर रूग्णालयानं दावा केलाय की तिचे वजन २०० किलोहून कमी झालंय. मग यामुळं तिच्या कुटुंबियांना तर आनंदच झाला पाहिजे. पण इमानच्या बहिणीने मात्र एक व्हिडिओ प्रसिद्ध करून रूग्णालय खोटे दावे करत असल्याचा आरोप केला. तिच्या मते इमानवरील उपचारासाठी आम्ही सैफी रूग्णालयाशी संपर्क साधला नव्हता तर सैफी रूग्णालयानं आमच्याशी संपर्क साधला होता. 


रूग्णालय दावा करत असलेल्या इतक्या मोठ्या प्रमाणात तिचे वजन कमी झालेले नाही, फारतर १०० किलो वजन कमी झाले असेल. वर्षभर रूग्णालयात ठेवून तिचे वजन कमी करू असं आम्हाला सांगितले होते, परंतु आता ते डिस्चार्ज घेण्यास सांगताहेत. सेकंड ओपिनियसाठी आम्ही इजिप्तमधील डॉक्टराला इकडं आणले असता सैफी रूग्णालयाने त्याला आतही प्रवेश दिला नाही. इमानच्या इतर आजारांच्या तक्रारी आता वाढताहेत, त्यावर कसा उपचार करणार ? असा प्रश्न तिनं उपस्थित केलाय. 


दुसरीकडं इमानती तब्येत चांगली असून तिचे सीटी स्कँनही झाले आहे. तसंच तिचे वजन २०० किलोहून कमी झाल्याचा दावा केलाय. तिच्या बहिणीने प्रसिद्ध केलेला व्हिडीओ ही दु:खद बाब असल्याचं रूग्णालयानं स्पष्ट केलंय. तसंच इमानच्या कुटुंबियांने केलेल्या आरोपामुळं होवून तिच्यावर उपचार करण्याच्या टीममधून एक डॉक्टरही बाहेर पडली आहे. 


इमानवरील उपचारात सैफी रूग्णालयास आतापर्यंत सुमारे दोन कोटी रूपये खर्च झाल्याचं समजतंय. परंतु तिच्यासाठी मदत आलीय केवळ ६५ लाख रूपये. त्यामुळं रूग्णालय आता तिच्यावरील आपचारात आखडता हात घेत असल्याचं समजतंय. इमानवरील उपचारामुळं जगभरात प्रसिद्धी होवून रूग्णालयाची भरभराट होईल, या आशेने इमानवर उपचार सुरू केले असले तरी तो डाव उलटला की काय अशी शंका आता उपस्थित केले जातायत. आता खरे कोण आणि खोटे कोण हे त्या दोघानाचा ठाऊक ?