समीर गायकवाडवर आरोप निश्चिती २३ जूननंतर
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी समीर गायकवाडवर २३ जूनपर्यंत आरोप निश्चित करु नका असे आदेश, मुंबई उच्च न्यायालयानं कोल्हापूर सत्र न्यायालयाला दिले आहेत.
मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी समीर गायकवाडवर २३ जूनपर्यंत आरोप निश्चित करु नका असे आदेश, मुंबई उच्च न्यायालयानं कोल्हापूर सत्र न्यायालयाला दिले आहेत.
गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आज कोल्हापूर सत्र न्यायालयात समीर गायकवाडवर आरोप निश्चिती केली जाणार होती. मात्र, पानसरे हल्ल्यात वापरलेल्या शस्त्राबाबत स्कॉटलंड यार्डचा बॅलास्टिक अहवाल अजून यायचा आहे. तो अहवाल येईपर्यंत समीर गायकवाड विरोधात आरोप निश्चित करु नयेत अशी मागणी सरकारी पक्षानं कोल्हापूर सत्र न्यायालयाकडे केली होती. मात्र कोल्हापूर सत्र न्यायालयानं ती मागणी फेटाळून लावली.
त्या विरोधात राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर झालेल्या सुनावणीत, मुंबई उच्च न्यायालयानं सरकारी पक्षाची मागणी अंशत: मान्य केली. त्यामुळे कोल्हापूर सत्र न्यायालयात समीर गायकवाडवर होणारी आरोप निश्चिती आता पुढे ढकलली गेलीय.