मुंबई : राज्यातल्या उष्णतेच्या लाटेची स्थिती गेल्या दोन दिवसात गंभीर झाल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. आणखी तीन ते चार दिवस उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेचं हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात आणि मध्यमहाराष्ट्रात अँटी सायक्लॉन तयार झाल्यानं ही उष्णतेची लाट आली आहे. सामान्यपणे एप्रिल महिन्यात गुजरात आणि राजस्थानमध्ये तयार होते. यंदा मात्र ही स्थिती मार्चमध्येच तयार झालीय...२८ आणि २९ मार्चला हे अँटीसायक्लॉननं गुजरात मधून उत्तर महराष्ट्रात प्रवेश केलाय. हळहळू हे अँटी सायक्लॉन सारा देश व्यापणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. 


वाळवंटी प्रदेशात तयार झालेले उष्ण आणि कोरडे वारे सध्या महाराष्ट्रासह मध्य भारतातून वाहत आहेत. जमिनीवरून वाहणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांच्या सोबत साधारणपणे दीड ते तीन किलोमीटर उंचीवरून खाली येणारे येणारे कोरडे वारेही मिसळले जात आहेत. या स्थितीमुळे उष्णतेच्या लाटेची तीव्रता आणि आवाका जास्त आहे. 


उष्णतेच्या लाटेची स्थिती आणखी तीन- चार दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर उत्तर- वायव्येकडून येणारे थंड वारे भारतात प्रवेश करण्याची शक्यता काही मॉडेल दर्शवत आहेत. तसं झाल्यास तापमानात एकाएकी मोठी घट होऊन उष्णतेच्या लाटेची स्थिती संपुष्टात येईल. मात्र, हवेत एकाएकी मोठा बदल झाल्यामुळे संसर्गजन्य रोगांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे.