मुंबई : आता मद्यपान करून वाहन चालवाल तर थेट तुमचं लायसन्स रद्द होणार आहे. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांचा परवाना तात्काळ निलंबीत करून त्यांना रोख दंड आणि शिक्षेची तरतूद केल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाबत सरकारने ठराव संमत केला असून त्याची घोषणा लवकरच केली जाणार असल्याचं सरकारने कोर्टात सांगितलंय. मुंबई पोलिसांकडे असलेल्या १४३ ब्रिथ अॅनालायझरपैंकी २४ काम करत नसल्याचंही सरकारने न्यायालयात स्पष्ट केलं. त्यावर पोलिसांना एकूण किती अॅनालायझरची आवश्यकता आहे, याची माहिती कोर्टानं सरकारकडे मागितली आहे. शिवाय 'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह' प्रकरणी आरोपीच्या रक्ताचा नमुना घेण्याचे निर्देशही पोलिसांना देण्यात आलेत. त्यासाठी राज्यात सध्या आठ फॉरेन्सिक लॅब असून एप्रिलपासून कोल्हापूरची प्रयोगशाळाही कार्यान्वित होणार असल्याची माहिती राज्य सरकारनं दिलीये. तसंच ४५ फिरत्या प्रयोगशाळाही लवकरच रस्त्यावर येणार आहेत. 


सरकारच्या या निर्णयाचं बहुतेक वाहन चालकांनी समर्थन केलंय. दारू पिऊन गाडी चालवून इतरांचे जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कठोर कारवाई गरजेची आहे असं बहुतांश चालकांना वाटतंय.  


मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणात बळी जाताहेत. वाहनातून प्रवास करणा-यांसोबतच रस्त्यावर असलेल्यांचाही जीव यामुळे धोक्यात टाकला जातोय. त्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी निव्वळ प्रबोधन पुरेसं नाही तर त्याला कठोर कायद्याच्या धाकाचीच गरज आहे.