आघाडीच्या बँकेकडून महिलांसाठी आता `वर्क फ्रॉम होम`
आयसीआयसीआय ही देशातील सर्वांत मोठी खासगी बॅंक महिला कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. यासाठी बँकेने विशेष तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई : आयसीआयसीआय ही देशातील सर्वांत मोठी खासगी बॅंक महिला कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. यासाठी बँकेने विशेष तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
देशात महिलांसाठी इतक्या व्यापक स्वरुपाची 'वर्क फ्रॉम होम' मोहिम प्रथमच राबविण्यात येणार आहे. यासाठी आयसीआयसीआयकडून खास 'फेस रेकग्निशन' आणि इतर सुरक्षाविषयक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
सध्या या मोहिमेंतर्गत सध्या ५० महिला घरुन काम करीत आहेत, स्वरुपाचे १२५ विनंती अर्ज करण्यात आले आहेत. या प्रकल्पांतर्गत सुमारे ५०० विनंती अर्ज येण्याचा बॅंक व्यवस्थापनाचा अंदाज आहे. सुमारे ७३ हजार मनुष्यबळ असलेल्या आयसीआयसीआयमध्ये सुमारे 30% महिला कर्मचारी आहेत.
या मोहिमेंतर्गत ग्राहकाशी थेट संबंध येत नसलेले बॅंकेमधील जवळपास प्रत्येक काम महिलांना घरुन करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. घरगुती कारणांमुळे महिलांनी काम सोडून नये, यासाठी ही व्यवस्था राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बाळंतपण, लहान मुले, वा कार्यालय व घरामधील जास्त अंतर या कारणांमुळे महिलांनी काम सोडण्याचे प्रमाण जास्त असल्याचे अंतर्गत सर्वेक्षणामधून दिसून आले आहे, असे आयसीआयसीआयच्या व्यवस्थापकीय अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी सांगितले.