मराठी महिला करतेय सातासमुद्रापार खेकड्यांचा व्यापार
महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीतला एक आवडता पदार्थ म्हणजे खेकडा... मुंबईतल्या खाडीत मिळणारा हा खेकडा सातासमुद्रापार पोहोचवला तो नवी मुंबईतल्या गुणाबाई सुतार यांनी...
स्वाती नाईक, नवी मुंबई : महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीतला एक आवडता पदार्थ म्हणजे खेकडा... मुंबईतल्या खाडीत मिळणारा हा खेकडा सातासमुद्रापार पोहोचवला तो नवी मुंबईतल्या गुणाबाई सुतार यांनी...
नवी मुंबईमधल्या गुणाबाई सुतारांचा व्याप आता बराच वाढलाय. त्या चिंबोरी आणि खेकड्यांचा व्यापार करतात. नवी मुंबईतल्या वाशी खाडीतले हे खेकडे गुणाबाईंनी थेट सिंगापूर आणि मलेशियापर्यंत पोहोचलेत. पण हे सोपं मुळीच नव्हतं... प्रचंड मेहनतीनं हे शक्य झालंय.
गुणाबाई वयाच्या आठव्या वर्षापासून मासेमारी करतात. त्यांचं शिक्षण अवघं पहिली इयत्ता... तरीही आज त्या यशस्वी निर्यातदार आहेत. सुरुवातीला त्या शेजारच्या गावात जाऊन चिंबोरी विकायच्या. हळूहळू मुंबईतल्या हॉटेल मालकांची गुणाबाईंच्या चिंबो-यांना मागणी वाढू लागली. मग गुणाबाई चेन्नईला चिंबोऱ्या पाठवू लागल्या... आणि १९८० पासून सिंगापूर आणि मलेशियात चिंबोऱ्या जायला लागल्या.
या व्यापारात गुणाबाईंना अनेक चढ उतार सोसावे लागले. व्यापार महत्वाच्या टप्प्यात असताना त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या माणसांनी धोका दिला, मग दोन वर्षं हा व्यवसाय बंद करावा लागला. पण त्या खचल्या नाहीत. त्यांच्या मुलाच्या मदतीनं त्यांनी हा व्यवसाय पुन्हा सुरू केला.
खेकड्याला हात लावताच तो भरलेला आहे की रिकामा आहे, हे गुणाबाईंना लगेच समजतं. भरलेल्या खेकड्याची किंमत जास्त आणि रिकाम्या खेकड्याची किंमत कमी असते. जे खेकडे हलके आहेत, त्यांना पुन्हा शेततळ्यात सोडून आणखी जाडजुड केलं जातं. पण त्यामध्ये त्यांना काही अडचणीही येतात. या व्यवसायाला चालना मिळावी यासाठी गुणाबाई आणि त्यांच्या मुलांनी नवी मुंबईतल्या ६५ मुलांना प्रशिक्षणासाठी चेन्नईतल्या खेकडा सेंटरमध्ये नेलं. पण शेत तळी मासेमारांच्या नावावर नसल्यानं शासनाचं कुठलंच अनुदान मिळत नाही.
गुणाबाईंनी नवी मुंबईतल्या या खाडीतले खेकडे सातासमुद्रापार पोहोचवलेच... पण त्याचबरोबर अनेकांना रोजगारही दिला.