नवी मुंबई : फळ मार्केटमध्ये कोकणातील हापूस आंब्याबरोबर कानडी आंब्यानंही जोरदार शिरकाव केला आहे. कोकणच्या हापूसच्या निम्म्या किमतीत कानडी हापूस विकला जातो. त्यामुळं आंब्याचे खवय्ये स्वस्तातल्या कानडी हापूसकडे आकर्षित होताना दिसतायंत. तर दुसरीकडं कोकणातल्या हापूसच्या पेटीत कानडी हापूस घुसडून चढ्या दरानं विकण्याचा गोरख धंदाही विक्रेत्यांनी सुरू केल्याचं बोललं जातंय. या सर्व प्रकाराला किरकोळ व्यापारीच जबाबदार असल्याचा आरोप घाऊक व्यापा-यांनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकणातला हापूस 300 ते 800 रुपयांना विकला जात असताना किरकोळ व्यापारी ग्राहकांची दिशाभूल करून कानडी हापूस दीडशे ते पाचशे रुपयांना विकत आहेत. कोकणचा हापूस आणि कर्नाटकातला हापूस हा सारखाच दिसतो. मात्र नीट पाहिल्यानंतर दोघांमधला फरक लक्षात येतो. 


कोकणच्या हापूस आंब्याची साल नाजूक असते, वरील देठाला खड्डा असतो. तसंच खालच्या बाजुला गोलाकार असतो. कोकणचा हापूस चिरल्यावर आत केसरी दिसतो आणि चवीला गोड असतो. तर कानडी हापूस आंब्याची साल जाड असते. देठाला गोल असतो. खालच्या भागात निमुळता असतो. तसंच चिरल्यावर रंग पिवळसर दिसतो. तर चवीला आंबट असतो. 


कानडी आंब्यामुळं बाजारात हापूसची आवक वाढली असली तरी दर मात्र चढेच आहेत. त्यामुंळ ग्रहकांना जादाचे पैसे माजोव लागत आहेत. हापूसचे अस्सल खवय्ये कोकणच्या राजाच्या खरेदीसाठी थेट पुण्याहून नवी मुंबईच्या मार्केटमध्ये दाखल झाले. पण त्यांचा भ्रमनिरास झाला.