मुंबई : नागपुरात नितीन गडकरी, मुख्यमंत्री यांच्या घराजवळ खून होतात. चोरी होते. ते नागपूर संभाळू शकत नाही ते काय महाराष्ट्र संभाळणार? मुख्यमंत्र्यांना गृहखाते समजलेले नाही, असा घणाघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी विधान परिषदेत केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजोबांच्या घरी १५ वर्षांची मुलगी घरी मसाला आणायला काय जाते आणि तिच्यावर गुंडाकडून बलात्कार होतो. या गुंडाना कायद्याचा धाक राहिलेला नाही. मुळात राज्यातील भाजप-शिवसेना सरकार अहमदनगरमधील कोपर्डी प्रकरणी गंभीरच नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गावाला भेट दिलेली नाही. एवढा मोठा गंभीर प्रकार असताना त्या ठिकाणी मुख्यमंत्री गेलेले नाही, ही त्यांची संवेदनशीलता आहे, अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी केली.


अहमदनगर काय पाकिस्तानात आहे का? कोपर्डीतील पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही का? आदी प्रश्न् उपस्थित करुन सरकारला राणे यांनी चांगलेच धारेवर धरले. आज गुंडाची आकडेवारी काढली तर सर्वाधिक गुंड हे भाजपचे आश्रीत आहेत. अनेक गुंड हे भाजपचे पदाधिकारी आहेत. उद्या भारतात दाऊद आला तर तोही भाजपमध्ये प्रवेश करून या सभागृहात प्रवेश करु शकेल, अशी वस्तूस्थिती आहे.  काँग्रेसने भ्रष्टाचार केला, हे बोलणं सोपे आहे. मात्र, मंत्रालयात ३० कोटी घेताना गजानन पाटीलला पकडण्यात येते. हा भ्रष्टाचार नाही का? मुंबईतील एका मोठ्या हॉटेलमध्ये कित्येक कोटीचे डील झाले. यात कोणाचा हात आहे. याचे फुटेज माझ्याकडे आहे. त्यांचे नावही माझ्याकडे आहे. भाजपच्या काळात काय चालले आहे ते पाहा. केवळ सुडापोटी ईडी तसेच अन्य यंत्रणा पाठिमागे लावून आम्हाला संपवायला निघालेय. आज हेच संपणार आहेत, असा घणाघात राणे यांनी यावेळी केला.


सध्या राज्यात पोलीस तक्रारी घेण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. हे का होत आहे? यांचेच आदेश असणार, त्याशिवाय असं होणार नाही. राज्यात गुन्हे वाढत असताना हे सरकार गुन्हे कमी झाल्याचे सांगत आहे. पोलीस साध्या कागदावर तक्रार नोंदवून घेतात. संबंधित व्यक्ती पोलीस स्टेशनमधून बाहेर पडली की तो कागद फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकला जातो. म्हणजेच तक्रार नोंद होत नाही. हे सरकार सांगणार बघा, आमच्या काळात गुन्हे कमी झालेत, हे यांचे काम, असा थेट हल्लाबोल राणे यांनी यावेळी केला.


दरम्यान, मुख्यमंत्री तातडीने कोपर्डीला का गेले नाहीत, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपस्थित केला. कोपर्डी प्रकरणावरून विधानसभेत वाक्युद्ध पाहायला मिळाले. या घटनेनंतर पालकमंत्र्यांनी तत्परता दाखवायला हवी होती, अशी अजित पवारांनी टीका केली. तर याला उत्तर भाजपकडून देण्यात आले. बिनबुडाचे आरोप करून गांभीर्य घालवण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा पटलवार नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी विधानसभेत केला.