मुंबई : येत्या ८ जुलैला राज्याच्या विधान परिषदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात परिषदेच्या सभापतीपदी रामराजे नाईक निंबाळकर यांची फेरनिवड करण्यात येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निंबाळकरांना काँग्रेससह सर्वपक्षीयांचा पाठिंबा असल्याने ही फेरनिवड निश्चित मानली जात आहे. याच अधिवेशनात नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणूकीत निवडून आलेल्या ८ आमदारांचा शपथविधीही होणार आहे. याआधीचे उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे यांचा यंदाच्या निवडणूकीत पराभव झाला आहे. त्यामुळे हे पद सध्या रिक्त आहे. 


यापदावर कुणाची निवड कशी आणि कधी करायची याविषयी मुख्यमंत्री, संसदीय कार्यमंत्री आणि सभापती यांची समिती ठरवेल, असे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान उपसभापतीपदासाठी भाजपचेही प्रयत्न सुरू आहे. 


काँग्रसेचे उपसभपती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधातल्या अविश्वास ठरवाच्या वेळी भाजपने राष्ट्रवादीला साथ दिली होती. त्यामुळे आता त्याची परतफेड व्हावी, अशी भाजपची इच्छा आहे. त्यादृष्टीने भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची पडद्यामागे चर्चा सुरू असल्याचं पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.