देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : अद्भूत वैद्यकीय करामतीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. १२ तास चाललेली हृदयावरची शस्त्रक्रिया आणि त्यानंतरही एक-दोन नव्हे तर सहा हार्ट अटॅक सहन करुन, मृत्यूला दिलेली मात.... ही करामत साधली आहे एका चार महिन्याच्या चिमुरडीने...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार महिन्याच्या चिमुरडीच्या चेहऱ्यावरील निरागस भाव पाहिले, तर हिला सहा हार्टअटॅक आले होते यावर आपला विश्वासच बसणार नाही... या लहानगीचं नाव आहे विदिशा... कल्याणमधल्या वाघमारे दाम्पत्याच्या पोटी जन्मलेली विदिशा दीड महिन्याची असताना विदिशा अचानक बेशुद्ध पडली... तिला उपचारासाठी मुंबईतल्या परळमधल्या वाडिया हॉस्पिटलमधे दाखल करण्यात आलं. चाचण्यांमध्ये विदिशाच्या हृदयाचा आकार उलटा असल्याचं स्पष्ट झालं आणि डॉक्टरांनी लगेचच शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.


बारा तासांच्या कठीणप्राय शस्त्रक्रियेनंतर विदिशाच्या हृदयाचा आकार बदलण्यात डॉक्टरांना यश आलं. मात्र, विदिशाची फुफ्फुसं शस्त्रक्रियेनंतरही योग्य प्रकारे काम करत नव्हती. त्यामुळे विदिशाला आयसीयूमध्ये तब्बल ५१ दिवस ठेवण्यात आलं. या दरम्यान तिला ६ वेळा हृदयविकाराचा झटका आला. परंतु, उच्च क्षमतेच्या ऑसिलेटरी वेंटिलेटरचा वापर करून तिची फुफ्फुसं स्थिर करण्यात आली, असा दावा विदिशावर उपचार करणारे डॉ. विश्वरंजन पांडा यांनी केलाय. 


या सगळ्या शस्त्रक्रियेसाठी पाच लाखांहून जास्त खर्च आला. मात्र, वाडिया हॉस्पिटल आणि सामाजिक संस्थेच्या मदतीने हा खर्च उभा करण्यात आला. आता विदिशाची प्रकृती स्थिर आहे आणि येत्या काही दिवसांतच विदिशा आपल्या घरी जाणार आहे.