शिवसेनेसोबतच्या युतीबाबत मनसेची सूचक प्रतिक्रिया
मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपची युती झाली नाही तर मनसेबरोबर शिवसेना जाणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपची युती झाली नाही तर मनसेबरोबर शिवसेना जाणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नावर मनसेनं सूचक विधान केलं आहे. शत्रूचा शत्रू तो आमचा मित्र असं वक्तव्य मनसेचे महापालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्यांमध्ये तशी भावना आहे, असंही संदीप देशपांडे म्हणाले आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे घेतील हेदेखील त्यांनी सांगितलं आहे.
महापालिका निवडणुकींसाठी शिवसेना-भाजपची युती होणार का नाही याबाबत अजून कोणताच निर्णय झाला नाही. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेली चर्चा फिस्कटल्यानंतर आता युतीचा निर्णय उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचं दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आलं.
विधानसभा निवडणुकीवेळीही शिवसेना आणि मनसेमध्ये युतीसाठी प्रयत्न झाले होते. विधानसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये फोनवर चर्चा झाली होती. तसंच मनसेनं त्यावेळी उमेदवारांना फॉर्म वाटणंही एका दिवसासाठी बंद केलं होतं. पण तेव्हा शिवसेना-मनसेची युती होऊ शकली नव्हती.