मनपा निवडणुकीसाठी मुंबई पोलिसांचा सुरक्षेसाठी मास्टर प्लान
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पोलिसांचा कस लागणार आहे. आघाडी आणि युती तुटल्याने पोलिसांवरील ताण आणखीनच वाढलाय. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षेसाठी मास्टर प्लान आखला आहे.
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पोलिसांचा कस लागणार आहे. आघाडी आणि युती तुटल्याने पोलिसांवरील ताण आणखीनच वाढलाय. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षेसाठी मास्टर प्लान आखला आहे.
सध्या राज्यात पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यात राज्यातीलच नव्हे तर संपुर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षवेधी आहे. या निवडणुकीत तापलेलं राजकीय वातावरण, राजकीय आरोप प्रत्यारोपामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांनी मुंबई निवडणूक सुरक्षा मास्टर प्लान तयार केला आहे. ज्याआधारे मुंबईचं वातावरण बिघडवणा-या समाज कंटकांचा बंदोबस्त केला जाणार आहे.
मुंबईत या निवडणूक सुरक्षेकरता मुंबई पोलीस दल 30 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत. 4500 हजार पोलीस अधिकारी कुमक असणार आहे. 5 हजार 800 होमगार्ड, केंद्रीय निम लष्करी दलाच्या 10 कंपन्या असणार आहेत. तर 7 हजार 433 पोलींग बुथवर स्पॉट सुरक्षा असणार आहेत. त्याचबरोबर मतदारांना प्रलोभनं दाखवण्या-यांवर गुप्तहेरामार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे. मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी केंद्राची देखील तीन स्तरीय सुरक्षा लावली जाणार आहे. मुंबई पोलीसांच्या तीन स्तरीय मुंबई निवडणुक सुरक्षा मास्टर प्लानमुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही असा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.