दीपक भातुसे, झी मीडिया मुंबई : राज्यातील नगरपालिका निवडणुकींच्या निकालाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपामधील स्थान अधिक पक्के झाले असून त्यांच्या नेतृत्वावर या निकालाने शिक्कामोर्बत केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील नगरपालिका निवडणुकीत अस्तित्वापुरत्या असलेल्या भाजपाला या निवडणुकीत घवघवीत यश मिळालं आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या निवडणुकीत लक्ष घालून निवडणुकीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. तर दुसरीकडे शिवसेनेला मिळालेले यशही अभूतपूर्व म्हणावं लागेल. विशेष म्हणजे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीत लक्ष न देताही शिवसेनेला हे यश मिळालं आहे.


राज्यातील 2014 च्या विधानसभेत घवघवीत यश मिळवून सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारची पहिली परीक्षा नगरपालिका निवडणुकीच्या रुपाने होणार होती. १४७ नगरपालिका आणि १७ नगरपरिषदांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत भाजपाची कसोटी लागणार होती. कारण २०११ च्या नगरपालिका निवडणुकीतील भाजपाची कामगिरी अत्यंत सुमार होती. त्यामुळे भाजपा सरकारच्या या पहिल्या परीक्षेला सामोरं जाण्याची मुख्यमंत्र्यांनी जोरदार तयारी केली. 


सर्व मंत्र्यांची बैठक घेऊन निवडणुकीवर लक्ष देण्याच्या सूचना केल्या. तर स्वतः निवडणुकीची सूत्र हातात घेऊन राज्यात ४० सभा घेतल्या. केंद्र आणि राज्य सरकारने दोन वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा लोकांसमोर ठेवून मुख्यमंत्री मतदारांसमोर जात होते. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या मेहनतीला यश आल्याचं नगरपालिकेच्या निकालावरून दिसून येतं. २०११ च्या निवडणुकीत केवळ 298 नगरसेवक असलेल्या भाजपाने या निवडणुकीत 980 नगरसेवक निवडून आणले आहेत. तर ५२ नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष निवडून आले आहेत. 


विदर्भाचा गड भाजपाने राखलाच, त्याशिवाय पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि खानदेशातही भाजपाने चांगली मुसंडी मारत विरोधकांना चीत केले. भाजपाला मिळालेल्या या यशाचे शिल्पकार म्हणून मुख्यमंत्र्यांकडे पाहिले जात आहे. विदर्भात सुधीर मुनगुटंवार, पश्चिम महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील, मराठवाड्यात रावसाहेब दानवे आणि  पंकजा मुंडे आणि कोकणात विनोद तावडे यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीची जबाबदारी सोपवत भाजपाला यश मिळेल अशा अनुषंगाने व्यूहरचना आखली होती. तर स्वतः संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार दौरे करत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. परिणामी या नगरपालिका निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशात मुख्यमंत्र्यांचा वाटा मोठा असून पक्षातील त्यांचे नेतृत्व अधिक भक्कम झाले आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भाजपामधील विरोधकांनाही चाप बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


दुसरीकडे या निवडणुकीत शिवसेनेनं मिळावलेलं यशही कौतुकास्पद आहे. २०११ च्या नगरपालिका निवडणुकीत केवळ 264 नगरसेवकांसह चौथ्या स्थानावर असलेल्या शिवसेनेने या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. २५ नगराध्यक्षांसह शिवसेनेचे 508 नगरसेवक या निवडणुकीत निवडून आले आहेत. 


विशेष म्हणजे या निवडणुकीत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी विशेष लक्ष घातलं नव्हतं. त्यांनी या निवडणुकीसाठी एकही सभा घेतली नाही. निवडणुकीची सर्व जबाबदारी त्यांनी स्थानिक आमदार आणि स्थानिक नेतृत्वावर सोपवली होती. विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात या निवडणुकीत शिवसेनेची कामगिरी चांगली झाली. त्यामुळे शिवसेनेसाठी हे यश महत्त्वाचे असून शिवसेनेचा करिष्मा कायम असल्याचे यावरून स्पष्ट होते.


लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपाठोपाठ नगरपालिका निवडणुकीत मिळालेले यश हे भाजपा आणि शिवसेनेचा आत्मविश्वास वाढवणारे आहे. या निकालांनी भाजपात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं आहे तर उद्धव ठाकरेंसाठी आणि शिवसैनिकांसाठी हा निकाल नवी ऊर्जा देणारा ठरणार आहे. त्यामुळेच आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी हे दोन्ही पक्ष अधिक जोमाने आणि नव्या उत्साहाने कामाला लागतील.