मुंबई :  अभिनेता नाना पाटेकर यांनी दुष्काळी भागात दारूबंदीची मागणी केली आहे. अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांना नाम नावाची संस्था पाणी अडवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी स्थापन केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाना पाटेकर मुंबईत एका कार्यक्रमात भावनिक आवाहन करताना म्हणाले, दोन्ही पिकं गेली आहेत. पुढच्या दोन ते तीन महिन्यांचा काळ संवेदनशील आहे. पीक गेलेच आहे, आता पाणीही नाही. त्यामुळे दु:खात असताना आम्हाला (शेतकऱ्यांना) दारू जवळ करावीशी वाटते. त्या नशेत बैलाच्या गळ्यातला कासरा शेतकरी गळ्याला लावतो, हे होऊ द्यायचे नसेल तर मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात तीन महिन्यांसाठी दारूबंदी जाहीर करा. थोडा महसूल बुडेल. पण अनेक शेतकऱ्यांचे जीव वाचतील.


अणेंसाठी नाना म्हणाले...


'अणे, विदर्भ माझा, खान्देश माझा आणि बिहारसुद्धा माझाच आहे. तुमचे वक्तव्य चूक की बरोबर, गैर आहे की नाही याची मीमांसा मला करायची नाही. माझा एक हात-पाय तोडला तर मी जिवंत कसा राहू शकतो? आपण सगळ्यांनी एकत्र राहू या.' नानांच्या या वाक्यावर सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.  


आमच्या पोलिसांना घरे कधी मिळतील?


आमच्या पोलिसांना घरे कधी मिळतील? असा सवाल नानांनी मुख्यमंत्र्यांना केला आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तरादाखल सांगितलं, ‘नाना, तुम्ही माझ्या मनातील प्रश्न विचारलात, या वर्षी पोलिसांच्या २९ हजार घरांचे नियोजन केले आहे. पोलिसांना हक्काचे, कायमस्वरूपी घर मिळण्याकरिता जे विकासक पोलिसांना घरे देतील, त्यांना अधिक चटईक्षेत्र निर्देशांक देण्यात येईल.’मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.