मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सनातनचा साधक वीरेंद्र तावडेला अटक करण्यात आल्यानंतर सनातनने आता कांगावा करायला सुरूवात केलीय. तावडेच्या अटकेबाबत सनातनने नाराजी व्यक्त केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी, सीबीआयनं पहिली अटक केली आहे. या प्रकरणी हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता वीरेंद्र तावडे याला सीबीआयनं अटक केली आहे. त्याला आज दुपारी ३च्या सुमारास पुण्यातील कोर्टात हजर केलं जाणार आहे. 


२ जुलै रोजी सीबीआयनं वीरेंद्र तावडे याच्या पनवेल इथल्या आश्रमावर आणि सारंग अकोलकर याच्या पुण्यातल्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर सीबीआयनं वीरेंद्र तावडेला संशयित म्हणून ताब्यात घेतलं होतं. गेले ८ दिवस वीरेंद्र तावडेची कसून चौकशी सीबीआयकडून सुरु होती. वीरेंद्रचे मोबाईलचे कॉल रेकॉर्ड आणि दाभोळकरांच्या हत्येच्या दिवशी वीरेंद्रच्या मोबाईलचं लोकेशन यासंबंधी, सीबीआयने पुरावे गोळा केले. 



दरम्यान चौकशीत वीरेंद्रनं दिलेल्या जबाबात सीबीआयला तफावत आढळली. म्हणून शुक्रवारी रात्री नऊ वाजता वीरेंद्र तावडेला, सीबीआयनं अधिकृतरीत्या अटक केली. त्याला सीबीआय आज न्यायालयात हजर करणार आहे. मात्र त्याला कोणत्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे, याबाबत सीबीआयनं कमालीची गुप्तता पाळली आहे.