लाचखोरी प्रकरणात चित्रा वाघ यांचे पती अडचणीत
राज्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सध्या महात्मा गांधी मेमोरिअल हॉस्पिटलच्या मेडिकल लायब्ररीचे प्रमुख किशोर वाघ यांचा कसून शोध घेतोय.
मुंबई : राज्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सध्या महात्मा गांधी मेमोरिअल हॉस्पिटलच्या मेडिकल लायब्ररीचे प्रमुख किशोर वाघ यांचा कसून शोध घेतोय.
किशोर वाघ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचे पती आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं महात्मा गांधी मेमोरिअल हॉस्पिटलचे अधीक्षक गजानन भगत आणि संदेश कांबळे यांना चार लाख रुपयांची लाच घेताना पकडलं. या लाचखोरीच्या प्रकरणात किशोर वाघ आरोपी आहेत. गजानन भगत आणि संदेश कांबळेंच्या जबानीनंतर वाघ यांना आरोपी करण्यात आलंय.
राष्ट्रीय ग्राहक न्यायालयानं दिलेल्या निकालानुसार याप्रकरणातल्या तक्ररदाराला नुकसान भरपाईची रक्कम देण्याचे आदेश दिले. ही रक्कम देण्यासाठी किशोर वाघ, गजानन भगत आणि संदेश कांबळे यांनी चार लाखांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाक़डे करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं, सापळा रचून संदेश कांबळे आणि गजानन भगत यांना एक लाखाच्या खऱ्या आणि तीन लाखाच्या खोट्या नोटांसह रंगेहात पकडलं. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. तर किशोर वाघ यांचा एसीबी शोध घेत आहेत.