मुंबई : एकीकडे मोदी सरकारच्या दोन वर्षपूर्तीची चर्चा सुरु असतांना, दुसरीकडे सर्वसाममान्य मुंबईकरांना मात्र गेले दोन दिवस रेल्वे सेवेचा मोठा फटका सहन करावा लागलाय. त्यामुळे कुठे आहेत अच्छे दिन असा सवाल मुंबईकरांच्या मनात आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवार संध्याकाळपासूनच मध्य रेल्वेच्या स्टेशनांवर गर्दी पहायला मिळत होती. मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेली मध्य रेल्वे एक दोन तास नव्हे तर सुमारे चार तास ठप्प होती. पहाटे किंवा सकाळी घर सोडलेल्या मुंबईकरांना ऐन उकाड्यात हा छळ सहन करावा लागला. सुरुवातीला माटुंगा स्टेशनवर पेंटाग्राफ तुटल्यानं वाहतूक विस्कळीत झाली, त्यात भर म्हणून की काय दुसरीकडे विक्रोळीजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि रेल्वेच्या जलद आणि धिम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.


संपूर्ण वेळापत्रकच कोलमडून पडलं आणि चाकरमान्यांना घरी पोहचायला मध्यरात्र उलटून गेली. मोदी सरकारच्या दुसऱ्या वर्षपूर्तीची ही पहाट होती. केवळ बुधवारी मध्यरात्रीपर्यंत हा त्रास संपला नाही, तर गुरुवारी सकाळीही हा तमाशा सुरुच होता. गुरुवारी सकाळीही मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे अर्धा तास उशिराने सुरु होती आणि मोदी सरकारच्या द्वितीय वर्धापनदिनी कुठे आहेत अच्छे दिन असा प्रश्न मुंबईकरांना पडला होता.


मध्य रेल्वेचं हे रडगाण गेल्या दोन दिवसांतलं नव्हे, तर गेल्या महिनाभरापासून लोकलसेवा अशीच रखडत सुरु आहे. एकीकडे बुलेटट्रेनची स्वप्न पाहताना, वेळापत्रकानुसार लोकल धावत नाहीत त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. महाराष्ट्राचे रेल्वेमंत्री झाल्यानंतर मुंबईकरांना चांगली सेवा मिळेल, हा भ्रमाचा भोपळा फुटतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 


सोशल मीडियावर मोदी सरकारच्या दोन वर्षांतील कार्याच्या कौतुकात मुंबईकरांचा हा अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नाचा मात्र उल्लेख झाला नाही हे दुर्देवच. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच ही अशी परिस्थिती  असल्याने पावसाळ्यात काय होणार या विचाराने मुंबईकरांच्या मनात धडकी भरलीय.