मुंबई : शहरात रस्त्याच्या कडेला आता हातगाड्यांवरील अन्न पदार्थ दिसणार नाहीत. कारण ३०  मेनंतर थेट कारवाई करण्यात येणार आहे. अन्न पदार्थ शिजवणाऱ्या गाड्यांना हद्दपार करण्याचा महापालिकेने विडा उचला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत रस्त्याच्या कडेला अन्न शिजवणाऱ्या चारचाकी गाड्या मुंबईतून हटविण्याचे धोरण पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने ठेवले आहे. ३० मेनंतर मुंबईत नो कुकिंग, नो इटिंग, नो ठेला गाडी असे सक्त आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.


उच्च न्यायालयाने यापूर्वीच अन्नपदार्थ रस्त्यावर बनवणाऱ्या गाडय़ा हटवण्याचे आदेश दिले होते. या विषयावर हिवाळी अधिवेशनातही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यावेळी नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी या गाड्या हटवण्यात येतील, असे आश्वासन दिले होते.


एप्रिलपासूनच ही कारवाई करण्यास सुरुवात केली असून आता या कारवाईचा वेग वाढून ३० मेनंतर एकही चारचाकी गाडी किंवा रस्त्यावर अन्नपदार्थ शिजवणारे फेरीवाले दिसणार नाहीत असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.


या कारवाईसाठी अतिक्रमण निर्मूलन विभागाने अॅक्शन प्लॅन तयार केलाय. मोठय़ा प्रमाणावर मनुष्यबळ, पोलीस, जेसीबी, यंत्रसामग्री घेऊनच ही कारवाई पार पाडण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. त्यानुसार ज्या वॉर्डात खाद्यपदार्थ बनविणाऱ्या गाड्या दिसतील तेथील लायसन्स अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा दिल्या जाणार आहेत, असे पालिका उपायुक्त रणजीत ढाकणे यांनी स्पष्ट केलेय.