निवडणुकीच्या तोंडावर बेस्ट भाडेवाढ नाही
2017-18चा अर्थसंकल्प बुधवारी बेस्ट समितीसमोर सादर करण्यात आला. पुढच्या वर्षी महापालिकेच्या निवडणुका होतायत.
मुंबई : 2017-18चा अर्थसंकल्प बुधवारी बेस्ट समितीसमोर सादर करण्यात आला. पुढच्या वर्षी महापालिकेच्या निवडणुका होतायत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर कुठलही भाडेवाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही. पण त्यामुळे बेस्टच्या डबघाईला आलेल्या अर्थकारणाला आणखी मोठा फटका बसणार आहे.
मुंबई पालिकेचा सार्वजनिक वाहतूकीचा उपक्रम असणाऱ्या बेस्टचा तोटा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात तब्बल 565.74 कोटी रुपयांची तूट दाखवण्यात आली आहे. बेस्टचं उत्पन्न पाच हजार नऊशे पंच्यांशी कोटी रुपये असून खर्च मात्र सहा हजार पाचशे एक्कावन्न कोटी रुपये असल्याचं महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी म्हटलं आहे. पण ही तूट भरून काढण्यासाठी कुठलीही ठोस उपाययोजना अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही.