मुंबई : बीएमसीच्या सभागृहात विरोधी पक्षनेताच नाही. मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा वाढतच चालला आहे. आज निवडणुकीनंतर  महापालिकेचे पहिले सभागृह हे विरोधी पक्षनेत्याविनाच झाले आहे. विरोधी पक्ष नेते पद हे भाजप घेण्यास तयार नाही. त्यामुळे तिढा वाढलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष हा भाजप आहे. महापालिका अधिनियमानुसार सत्ताधाऱ्यांव्यतिरिक्त दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष विरोधी पक्ष असतो. पण भाजपने विरोधी पक्षनेता पद स्वीकारण्यास तयारी न दर्शवल्यामुळे तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेस पक्षाने विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा केला आहे. 


परंतु तिसऱ्या पक्षाला हे पद देण्याची तरतूद नाही. त्यामुळे याबाबत कायदेशीर अभिप्राय मागण्यात आला आहे. मात्र, विरोधी पक्ष नेतेपद कोणाला द्यावे हा महापौरांचा अधिकार आहे. त्यांनी हे पद काँग्रेसला देण्याचे ठरवले तर काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता होऊ शकतो.


परंतु भाजपाने विरोधी पक्षनेतेपद न स्वीकारल्यास ते काँग्रेसला न देता संसदेप्रमाणे विरोधी पक्ष नेते पद न देता गटनेत्यांच्या मदतीनेच सभागृह चालवण्याची रणनीती सत्ताधारी शिवसेनेकडून आखली जात आहे.


महापालिकेतील विरोधी पक्ष नेतेपदाला वैधानिक दर्जा प्राप्त झाला असून, जर महापालिकेत विरोधी पक्षनेते पद न दिल्यास आजवरच्या मुंबईच्या इतिहासात ही घटना प्रथमच घडणार आहे.