मुंबई : भ्रष्टाचाराला कितीही चाप लावण्याचा प्रयत्न झाला तरी तो काही केल्या थांबत नसल्याचे पुढे येत आहे. एका सरकारी अधिकाऱ्याकडे किती संपत्ती असेल याचा तुम्ही अंदाज करु शकत नाही. ही संपत्ती पाहून धक्काच बसेल. या लाचखोर अधिकाऱ्याची माया पाहून पोलीसही अचंबित झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई आणि वसईत चार कोटींचे पाच फ्लॅट, वसई विकास बँकेत २ किलो सोने, ३३ लाखांची कॅश तर हैदराबादला लपवले ९१ लाख रुपये. हैदाराबदमध्ये १० फ्लॅट आणि १ बंगला, अशी या सरकारी अधिकाऱ्याची संपत्ती असल्याचे पुढे आलेय.


लॉकर उघडले तेव्हा...


वसई-विरार महानगरपालिकेतील नगररचना खात्याचा उपसंचालक वाय. शिवा रेड्डी याचे ‘माया’जाल पाहून पोलीसही अचंबित झालेत. पोलिसांनी काल रेड्डीचे वसई विकास बँकेतील लॉकर उघडले तेव्हा त्यात दोन किलो सोने आणि ३३ लाखांची कॅश सापडली.


लाचखोर रेड्डीचे अनेक गैरव्यवहार पालिकेतील शिवसेना गटनेते धनंजय गावडे यांनी उघड केले होते. गावडे यांना गप्प करण्यासाठी रेड्डीने त्यांना एक कोटीची ऑफर दिली. गावडे यांनी याबाबत ठाणे अ‍ॅण्टी करप्शनकडे तक्रार करून सापळा लावला. रेड्डी या सापळ्यात सापडला आणि २५ लाखांची लाच देताना पोलिसांनी पकडले.


कितीही प्रॉपर्टी ?


मुंबई व वसई परिसरांत ४ कोटींचे ५ फ्लॅट असून हैदराबादला गेलेल्या पोलिसांना त्याच्या तेथील घरातून ९१ लाखांची रोकडही सापडली. एवढेच नव्हे तर तेथे त्याच्या नावावर १० फ्लॅट, १ बंगला आणि अनेक भूखंड असल्याचेही तपासात पुढे आलेय.


कोणाचा आशीर्वाद?


वाय. शिवा रेड्डी हा एकटाच नसून वसई पालिकेत लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांची टोळीच कार्यरत असल्याचा आरोप धनंजय गावडे यांनी केलाय. रेड्डी याच्या कार्यकाळात किती प्रकल्पांना मंजुरी दिली याची चौकशी केली तर सत्ताधारी पक्षातील अनेकजण गजाआड जातील, असे गावडे म्हणाले. पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलेय.