गणेश कवाडे, मालाड : मुंबईसारख्या शहरात मालाड अप्पापाडा परिसरात राहत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीला घरातील विद्युत पुरावठ्याअभावी आपला जीव गमवावा लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनू नाईक हे मुंबई पोलीस दलात कुरार पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक उप-निरिक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालाय... नाईक आपल्या परिवाराबरोबर मालाड येथील 'आप्पा पाडा' भागात गेल्या 27 वर्षापासून राहत आहेत. मात्र, ही जमीन वनविभागाच्या हद्दीत येते. या ठिकाणी राहणाऱ्या सर्व नागरिकांना वनविभागाने स्थलांतर करण्यात येईल असं सांगितलं.


काही लोकांचं स्थलांतरही करण्यात आलं... मात्र, काही कुटुंब अजूनही इथं रहात आहेत. इथं कोणत्याही मुलभूत सुविधा देण्यात आलेल्या नाहीत... घरात विजेचीही सोय नाही... अशात सोनू नाईक यांच्या पत्नी सुरेखा आजारी पडल्या. त्यांना ऑक्सिजनच्या पुरवठ्याची तातडीनं गरज होती. मात्र, घरात वीज नसल्यामुळे ऑक्सिजन देता आलंच नाही आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.


जर याठिकाणी विद्युत पुरवठा असता तर सुरेखा यांना वेळीच ऑक्सिजन मिळालं असतं आणि त्यांचा जीव वाचला असता, असं डॉक्टर पंकज बंग यांनी म्हटलंय. 


या दुर्दैवी घटनेबाबत शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांकडे विचारणा केली. येथील नागरिकांना आम्ही सुविधा देण्यासाठी तयार आहोत, मात्र वनविभागाचे अधिकारी परवानगी देत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय.


मुंबई उपनगर सारख्या विभागात विद्युत पुरवठामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव जाणे ही खेदजनक बाब आहे. शासकीय यंत्रणेची अनास्था एकाद्याच्या जीवावर कशी उठू शकते, याचं हे उदाहरण... निदान या घटनेपासून धडा घेऊन तरी पूनर्वसनाचं काम तातडीनं होणार का? असा सवाल इथले रहिवासी विचारत आहेत.