पवई तलावात अनधिकृत हाऊसबोट सुरुच, रोखल्याने कर्मचाऱ्याला मारहाण
पवई तलावात बोटींग करण्यास तसंच मासेमारी करण्यास मनाई केलीय. तरीही तलावात जाण्यापासून रोखल्याच्या कारणास्तव न्यूटन जोशवा या व्यक्तीने महाराष्ट्र स्टेट अँगलिंग असोसिएशनचा कर्मचारी इम्रान शेखला बेदम मारहाण केली.
मुंबई : पवई तलावात हाऊसबोट उलटून झालेल्या अपघातात तिघांना जीव गमवावा लागल्यानंतर मुंबई मनपाने या तलावात बोटींग करण्यास तसंच मासेमारी करण्यास मनाई केलीय. तरीही तलावात जाण्यापासून रोखल्याच्या कारणास्तव न्यूटन जोशवा या व्यक्तीने महाराष्ट्र स्टेट अँगलिंग असोसिएशनचा कर्मचारी इम्रान शेखला बेदम मारहाण केली. ही सर्व मारहाण सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
यावेळी न्यूटनने या कर्मचा-याच्या अंगावर सोबत आणलेले कुत्रे सोडण्याचाही प्रयत्न केला. न्यूटन हा या तलावात अनधिकृत हाऊसबोट चालवत होता. २३ डिसेंबरच्या रात्रीची दुर्घटनाग्रस्त हाऊसबोटही न्यूटन जोशवा याची असल्याने महाराष्ट्र अँगलिंग असोसिएशनने जोशवाचं सदस्यत्व रद्द केलं होतं. या मारहाणीनंतर पवई पोलीस ठाण्यात कार्यालयाची मोडतोड केल्याची तक्रार दाखल आहे.
पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये जोशवा कर्मचा-याला मारहाण करत असल्याचं दिसत आहे. पोलीस मारहाणीची तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप असोसिएशनने केलाय. मात्र या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंद होते. दखलपात्र गुन्हा नोंद होत नाही अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाई महाडेश्वर यांनी फोनवरून दिली.