खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले निर्देश


            


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : सुमारे वर्षभरापूर्वी डोंबिवली औद्योगिक वसाहतीत प्रोबेस कंपनीमध्ये रसायनांचा भीषण स्फोट होऊन मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी झाली होती. या स्फोटातील पिडीतांना अद्याप शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळालेली नसल्याची बाब कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिली असता नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्याची कारवाई त्वरित सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.


खा. डॉ. शिंदे यांनी मंगळवारी पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या स्फोटातील पिडीतांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी आग्रही मागणी केली. या भीषण स्फोटाची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची समितीदेखील नेमण्यात आली होती. मात्र, सदर दुर्घटनेला २६ मे २०१७ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे, तरीही चौकशी समितीने आपला अहवाल सादर केलेला नाही, असेही खा. डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. तहसीलदारांनी सुमारे २६६० पंचनामे केले. सदर दुर्घटनेत मालमत्ता व इमारतींचे नुकसान झालेल्या पिडितांना मुख्यमंत्री सहायता निधीतून रु. ०७ कोटी ४३ लाख २७ हजार ९९० इतकी रक्कम मिळावी म्हणून तहसीलदार कार्यालयामार्फत प्रस्ताव देखील सादर करण्यात आला होता.


परंतु, अद्यापपर्यंत दुर्घटनेमध्ये नुकसान झालेल्या पिडीतांना शासनामार्फत भरपाई मिळालेली नाही, त्यामुळे पिडीतांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे, असे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटाचा चौकशी अहवाल चौकशी समितीकडून लवकरात लवकर मागवून दुर्घटनेतील पिडीतांना देय असलेली अपेक्षित नकसान भरपाई देण्यात यावी, अशीही आग्रही मागणी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.


त्यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ याबाबतची कारवाई सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे प्रोबेस स्फोटातील दुर्घटनाग्रस्तांना दिलासा मिळणार आहे.