राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई : मध्य रेल्वेने गेल्यावर्षी जानेवारीत १५०० किलो दह्यासाठी तब्बल दीड कोटी रूपये खर्च केलेत. म्हणजे एका किलोसाठी तब्बल ९००० रूपये मोजण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे अधिका-यांनी रेल्वेला भ्रष्टाचाराच्या गर्तेतून बाहेर काढावं. आपली प्रतिमा सुधारण्यावर भर द्यावा असे खडे बोल नुकतेच पंतप्रधानांनी सुनावले होते. त्याचवेळी मुंबईत माहितीच्या अधिकारा अंतर्गत मिळालेल्या माहितीतून रेल्वेचा कथित घोटाळा बाहेर आलाय. रेल्वेच्या किचन गोडाऊनसाठी खरेदी होणाऱ्या सामग्रीविषयी माहिती मागवण्यात आली. त्यात धक्कादायक माहिती समोर आलीय.


रेल्वेच्या कमर्शियल ब्रँचने २०१६ मध्ये १०० ग्रॅम दह्याचे १५,३३६ युनिट खरेदी केले. त्यासाठी तब्बल दीड कोटी रूपये मोजण्यात आले. म्हणजेच १०० ग्रॅम दह्याची किंमत झाली ९७२ रूपये. बाजारात एक किलोसाठी दह्यासाठी ८० रूपयांचा भाव आहे. म्हणजेच रेल्वेने ८० ते १०० रूपयांचं दही तब्बल ९७२० रूपये खर्चून खरेदी केलं.


इतरही काही गोष्टींच्या खरेदीत अशीच धक्कादायक आकडेवारी दिसतेय. मात्र रेल्वे प्रशासनाला हे मान्य नाही. ही काहीतरी टायपिंग मिस्टेक असल्याचं रेल्वेने स्पष्टीकरण दिलंय.


रेल्वेची विविध कँटीन कशी तोट्यात चालतायत मात्र खासगी ठेकेदार नफ्याची मलई चाखतायत हेही माहिती अधिकारात उघड झालंय. त्यामुळे सामग्रीच्या खरेदी व्यवहारात होणारे गैरव्यवहार तर या तोट्याला कारणीभूत नाहीत असा सवाल यामुळे उपस्थित होतोय. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे क्लिन इमेजचे मंत्री म्हणून ओळखले जातात. त्यामुळे रेल्वेत असा काही भ्रष्टाचार सुरू असल्यास तो रेल्वेमंत्री मोडून काढणार का हा प्रश्न निर्माण होतो.