रेल्वे स्टेशन परिसरात तात्काळ वैद्यकीय मदत, खासगी डॉक्टरांकडून उपचार शक्य
रेल्वे स्टेशन परिसरात जखमी प्रवाशाला तत्काळ वैद्यकीय मदत मिळणं शक्य होणार आहे. स्टेशनवर डॉक्टर उपलब्ध नसल्यास नजीकच्या खासगी डॉक्टरला मदतीसाठी बोलावता येणार आहे.
मुंबई : रेल्वे स्टेशन परिसरात जखमी प्रवाशाला तत्काळ वैद्यकीय मदत मिळणं शक्य होणार आहे. स्टेशनवर डॉक्टर उपलब्ध नसल्यास नजीकच्या खासगी डॉक्टरला मदतीसाठी बोलावता येणार आहे.
रेल्वेनं याबाबतचे निर्देश दिलेत. सियालदेह ट्रेनमध्ये मृत्यू झालेल्या श्रीकांत यांच्या मृत्यूनंतर रेल्वेनं हे पाऊल उचललंय. दुसरीकडे श्रीकांत यांच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा दाखवणाऱ्या टीसीला रेल्वेनं निलंबित केलंय.
ट्रेनमधून प्रवास करताना श्रीकांत आजारी पडले होते. त्यानंतर श्रीकांत यांना कोणतीही वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. १२ स्टेशन्स जाईपर्यंत श्रीकांत यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. या दरम्यान श्रीकांत यांच्या कुटुंबीयांनी टीसी आर.के.राम यांच्याकडे मदत मागितली. तरीही काही उपयोग झाला नाही. अखेर उपचाराअभावी श्रीकांत यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर झी मीडियानं हे प्रकरण उचलून धरलं. रेल्वेनं याची दखल घेत त्रिस्तरीय समिती नेमली होती. समितीच्या अहवालानंतर एक टीसीला निलंबित करण्यात आलंय. तर एका डॉक्टरला बडतर्फ करण्यात आलंय.