मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर पुन्हा हल्लाबोल चढवलाय. भाजप वैयक्तिक स्वार्थासाठी 'नीट'चे राजकारण खेळत आहे, असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला.


भाजपकडून ‘नीट’चा घोळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप वैयक्तिक स्वार्थासाठी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करत आहेत. ही मुले दोन वर्ष अभ्यास करत आहेत. एक एक लाख त्यासाठी खर्च केलेत. हे भाजपच्या सरकारला कळत नाही. स्वत:चा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी भाजपकडून ‘नीट’चा घोळ करुन ठेवण्यात आलाय, असे राज म्हणालेत.


‘नीट’विरोधी पालक आणि विद्यार्थ्यांनी आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या समस्या मांडल्यात. यावेळी राज यांनी भाजप सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआडून स्वत:चे राजकारण साधत असल्याचा आरोप केला.


विद्यार्थ्यांवर अवघड परिस्थिती ओढावली


न्यायालयाने ‘नीट’ची परीक्षा घेण्याचे आदेश दिले असले तरी सध्या बाजारात ‘नीट’च्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके उपलब्ध नाहीत. याशिवाय, विद्यार्थी गेल्या दोन वर्षांपासून सीईटीची तयारी करत होते. आता न्यायालयाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर अवघड परिस्थिती ओढावली आहे.


काँग्रेसचे हिशेब चुकते करण्यासाठी..


मात्र, भाजपमधील नेत्यांची वैद्यकीय महाविद्यालये नसल्याने त्यांना या सगळ्याशी काही घेणेदेण नाही. राज्यातील बहुतांश वैद्यकीय महाविद्यालये काँग्रेस नेत्यांची आहेत. त्यामुळे ‘नीट’च्या माध्यमातून भाजप काँग्रेसबरोबरचे राजकीय हिशेब चुकते करण्याचा प्रयत्न करत आहे, असे राज यांनी म्हटले.


 सरकारला डान्सबारची काळजी


मोदी सरकारकडून राज्यांचे महत्त्व कमी करण्यासाठी प्रयत्न आहे. केंद्राला जे निर्णय घ्यायचे असतात, ते सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून सुनावले जातात. या सरकारला डान्सबारची काळजी आहे, विद्यार्थ्यांची नाही. उद्या विद्यार्थ्यांनी काही बरं-वाईट केलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवालही राज यांनी केला.