नॅशनल पार्कमधील `भीम` बिबट्याला आठवलेंनी घेतले दत्तक
अखेर नॅशनल पार्क मधल्या `भीम`ला पालक मिळालेच... रामदास आठवले यांनी भीमच्या पालकत्वाची जबाबदारी उचललिय...पाहुयात एक रिपोर्ट...
दिनेश दुखंडे, झी मीडिया मुंबई : अखेर नॅशनल पार्क मधल्या 'भीम'ला पालक मिळालेच... रामदास आठवले यांनी भीमच्या पालकत्वाची जबाबदारी उचललिय...पाहुयात एक रिपोर्ट...
सोमवारी दुपारी बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये बिबट्याच्या भेटीला चक्क पँथर आला होता...पण हा खरोखरचा पँथर नव्हता, तर राजकारणातला पँथर होता... रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे आपल्या कुटुंब आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नॅशनल पार्कमध्ये आले होते. निमित्त होतं बिबटयाला दत्तक घेण्याचं...
सहा वर्षांच्या 'भीम' नावाच्या बिबट्याला आठवले यांनी आपला मुलगा जीतसाठी दत्तक घेतलंय... नॅशनल पार्कमधल्या वन्य जीवरक्षक अधिकाऱयांना सहा वर्षांपूर्वी शहापूरच्या जंगलात बिबट्याचे दोन बछडे पुराच्या पाण्यात वाहून जाताना आढळले होते. त्यांचे प्राण वाचवून अधिकाऱयांनी बछड्यांना नॅशनल पार्कच्या रेस्क्यु सेंटरमध्ये आणलं होतं..
'भीम' आणि 'अर्जुन' असं त्यांचं नामकरणही करण्यात आलं होतं. त्यापैकी 'अर्जुन'ला तीन वर्षांपूर्वी ठाण्याच्या साधना माने यांनी दत्तक घेतलंय. तर 'भीम'ला आता पालक मिळालेत. पिंजऱ्याला हार घालून आठवले कुटुंबानं अगदी थाटामाटात भीमचं पालकत्व स्वीकारलय.
वन्य प्राण्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी शासनानं डिसेंबर 2013 मध्ये वन्य प्राणी दत्तक योजना सुरु केलीय. त्यानुसार नॅशनल पार्कमधील वन्य प्राण्यांचं वर्गीकरण करण्यात आलंय. त्यानुसार त्यांच्या आहार आणि औषधोपचारांचा वर्षभराचा खर्च त्यांचं पालकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो. गेल्या तीन वर्षांत या योजनेला संमिश्र प्रतिसाद मिळालाय...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य आणि तेजस यांनीही तीन वर्षांपूर्वी यश नावाचा वाघ आणि रान मांजरी वाघाटी दत्तक घेतल्या आहेत. ठाकरेंच्या पावलावर पाऊल ठेवत आठवलेंनीही त्यांच्या राजकीय स्टाईलनुसार नेमकं बिबट्यालाच दत्तक घेतलंय...नॅशनल पार्कमध्ये जेस्पा नावाचा सिंहही आहे आणि तोही सध्या पालकत्वाच्या प्रतीक्षेत आहे....