मुंबई : सामनाच्या संपादकीयात आज नोटाबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आलाय. 'रोम जळत असताना नीरो फीडल वाजवत होता', अशा शब्दात संपादकीयातून मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण संपादकीयात एकदाही मोदींच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. पण नोटाबंदीच्या निर्णयामुळे जनता भिकाऱ्यासारखी रांगेत उभी राहिलीय. हा निर्णय जालियनवाला बागेच्या गोळीबारापेक्षाही भयंकर असल्याचं संपादकीयात म्हटलं गेलंय.


नेमकं काय म्हटलं गेलंय 'सामना'त...


१२५ कोटी जनतेला पंधरा दिवस भिकारी बनवून रांगेत उभे केले व पुढचे चार-पाच महिने देश रांगेत व ‘रांगत’ राहील. म्हणूनच ही रांगेतली रांगणारी जनता सांगत आहे, ‘‘बाळासाहेब, आज तुम्ही हवे होता!’’ निवडणुका नसतानाही लोकांच्या बोटांना ‘शाई’ लावून रांगेत उभे करणे हा राष्ट्रीय अपराध आहे. शाई लावलेली बोटे खिशात लपवून लोक निराश मनाने जगत आहेत. हे नैराश्य म्हणजेच देशभक्ती असे कुणाला वाटत असेल तर असे बोलून देशभक्तांचा अपमान करणार्‍यांच्या जिभा हासडून काढायला बाळासाहेब तुम्हीच हवे होता. १२५ कोटी लोकांच्या जीवनाचा सांगाडा झाला आहे. बाजार बंद, कारखाने बंद, रोजगार बंद. चुली विझल्या. पण लोकांची मनेही विझून गेल्यासारखी दिसतात. या विझलेल्या मनावरील राखेवर फुंकर मारून निखारे धगधगत ठेवायला बाळासाहेब तुम्हीच हवे आहात. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी १२५ कोटी जनतेची हीच मानवंदना आहे.