निवडणुकीनंतर मनसेला `सेल्फी पॉईंट`चाही खर्च परवडेना!
मुंबईत शिवाजी पार्कवर तयार करण्यात आलेला पहिला सेल्फी पॉईंट गुंडाळण्यात आलाय. त्यामुळे `सेल्फी फॅन्स` मात्र चांगलेच हिरमुसलेत.
मुंबई : मुंबईत शिवाजी पार्कवर तयार करण्यात आलेला पहिला सेल्फी पॉईंट गुंडाळण्यात आलाय. त्यामुळे 'सेल्फी फॅन्स' मात्र चांगलेच हिरमुसलेत.
मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या पुढाकारानं शिवाजी पार्कमध्ये हा 'सेल्फी पॉईंट' तयार करण्यात आला होता... पण महापालिका निवडणुकीतल्या पराभवानंतर संदीप देशपांडे यांनी सेल्फी पॉईंट बंद करण्याचा निर्णय घेतलाय.
सीएसआर फंड नाही म्हणून...!
'सेल्फी पॉईंट'च्या देखभालीसाठी सीएसआर फंड उपलब्ध होणं कठीण असल्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागलाय.
परदेशातल्या 'सेल्फी पॉईंट' या संकल्पनेला मुंबईत मोठा प्रतिसाद मिळाला होता. पावसाळा, दिवाळी, व्हॅलेंटाईन डे या निमित्तानं या सेल्फी पॉईंटवर वेगवेगळी सजावट केली जायची. विशेषतः तरुणाईकडून या संकल्पनेला उत्तम प्रतिसाद होता, या पॉईण्टवर सेल्फी काढायला तरुणांची गर्दी व्हायची. पण आता हा सेल्फी पॉईण्ट गुंडाळण्यात आलाय.
आता मनसेनं माघार घेतल्यामुळे आता त्याच ठिकाणी स्वतःचा सेल्फी पॉईंट निर्माण करण्यासाठी शिवसेना भाजपमध्ये स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे.